मोदी आडनावावरून केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली. त्यानंतर आज (९ ऑगस्ट) राहुल गांधी लोकसभेतही परतले. लोकसभेत परतल्यावर केलेल्या पहिल्याच भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. राहुल गांधी यांच्यासह विरोधी बाकांवरील खासदारांनी मणिपूर प्रश्नावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृहात राहुल गांधींनी केलेल्या एका कृतीमुळे राजकीय वातावरण तापलं.
भाषण केल्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभा सभागृह सोडलं. राहुल गांधी बाहेर पडत असताना त्यांच्या हातातल्या काही फाईल्स खाली पडल्या. त्या फाईल्स उचलण्यासाठी राहुल गांधी खाली वाकले. तेव्हा तिथे बसलेले भाजपा खासदार राहुल गांधींवर हसले. भाजपा खासदारांच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधींनी या सर्व खासदारांना पाहून फ्लाइंग किस दिलं. यानंतर भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अघ्यक्षांकडे तक्रार दाखल केली. असभ्य वर्तनासाठी राहुल गांधींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा- “राहुल गांधींचे आक्षेपार्ह हावभाव…”, ‘त्या’ कृतीवर एनडीएच्या महिला खासदारांची टीका
या सर्व घडामोडींनतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे. तुम्हाला द्वेष करण्याची एवढी सवय झाली आहे, की राहुल गांधींनी प्रेम आणि आपुलकीने केलेली कृतीही तुम्हाला समजत नाहीये. तुम्ही त्यांच्याविरोधात विष ओकत असताना, ते तुमच्याशी प्रेमाने वागत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली.
राहुल गांधींनी सभागृहात दिलेल्या फ्लाइंग किस प्रकरणावर भाष्य करताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “राहुल गांधी सभागृहात बोलत असताना भाजपाचे सर्व मंत्री उभे राहिले होते. ते सर्वजण भाषणात अडथळा निर्माण करत होते. तरीही राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे पाहून प्रेमळ हावभाव (फ्लाइंग किस) दिले. याची त्यांना काय अडचण झाली. त्यांना द्वेष करण्याची एवढी सवय झाली आहे की त्यांना प्रेम आणि आपुलकीने केलेली कृतीही समजत नाहीये. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांची खासदारकी तुम्ही रद्द केली. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांना तुम्ही घरातून हाकलून दिलं. ते खटला जिंकून आता परत आले आहेत. तरीही ते तुमच्याशी द्वेषपूर्ण वागत नाहीयेत. जेवढं विष तुम्ही ओकत आहात. त्यामुळे राहुल गांधींच्या कृतीची तुम्हाला अडचण होत असेल तर ती तुमची अडचण आहे, बाकी कुणाची नाही.”