Video: “मोदीजी सर्वात ग्रेट राजकारणी”, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेमकं घडतंय तरी काय?

प्रियांका चतुर्वेदींचा एका मुलाखतीमधला व्हिडीओ व्हायरल होत असून त्यातील दाव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

priyanka chaturvedi praised pm narendra modi
प्रियांका चतुर्वेदींची केलं मोदींचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम/पीटीआय संग्रहित)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने एकीकडे राज्यातलं राजकीय वातावरण तापू लागलेलं असताना दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे निश्चित नसलं, तरी तो लोकसभा निवडणूक निकालांनंतरचा असल्याचं त्यातील संवादावरून स्पष्ट होत आहे. मात्र, त्याहून जास्त चर्चा या व्हिडीओमध्ये प्रियांका चतुर्वेदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानांची होत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या घडामोडी चालू असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणं चर्चेचा विषय ठरलं आहे. हा व्हिडीओ एका मुलाखतीचा असून त्यात प्रियांका चतुर्वेदींना त्यांचे सर्वात आवडते राजकारणी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर उत्तर देताना प्रियांका चतुर्वेदी काही क्षण विचारात पडल्याचं दिसून आलं. पण लागलीच त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

प्रियांका चतुर्वेदींनी का केलं मोदींचं कौतुक?

प्रियांका चतुर्वेदींनी आपल्या उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वात महान राजकारणी म्हटलं आहे. “मी सांगेन की सर्वात ग्रेट राजकारणी नरेंद्र मोदीजी आहेत. कारण त्यांनी मतदारांना त्यांच्याकडे आकृष्ट केलं आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षातल्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या स्वत:च्या शिरावर घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात तशी गुणवत्ता असलीच पाहिजे. खूप सारे तरुण, महिला मतदार त्यांच्यामुळे प्रभावित झाले आहेत”, असं प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.

“लोकसभा निवडणुकीत त्यांना कमी जागा मिळाल्या हे ठीक आहे. पण त्यांच्यात काही उल्लेखनीय नाही असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. त्यांची तिसरी टर्म बहुमतामध्ये नाही हे खरं आहे. त्यांचा यावरचा प्रभाव कमी कसा होत चालला आहे यावर आपण कितीही चर्चा करू शकतो. पण त्यांनी भाजपाला अशा टप्प्यावर नेलं होतं जिथे भाजपा स्वबळावर स्पष्ट बहुमत घेऊन देशातली सर्वात मोठी पार्टी ठरली. मोदींची लाट होती हे मान्य करायला हवं”, असं त्या म्हणाल्या आहेत.

नाना पटोलेंची व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक पक्षाला आपापले अधिकार आहेत. ते स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांनी कुणाचं कौतुक करावं किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे”, असं ते म्हणाले.

“एनडीए म्हणजे नरेंद्र…”; शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक!

प्रियांका चतुर्वेदींची राजकीय कारकीर्द

प्रियांका चतुर्वेदींनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेसपासून २०१०मध्ये केली होती. २०१२ साली त्या युवक काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीही झाल्या. २०१९मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याशी गैरवर्तन केल्यानंतर पक्षातून निलंबित केलेल्या काही कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्णयामुळे त्यांनी पक्ष सोडला. २०२१ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गटात राहण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Priyanka chaturvedi praised pm narendra modi viral video sparks speculations pmw

First published on: 21-10-2024 at 12:30 IST
Show comments