गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ ठाकरे गटाने व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे. विधानसभेतही हे प्रकरण चर्चीले गेलं. अशातच आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या दाव्याने याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. हा व्हिडीओ प्रकाश सुर्वेंच्या मुलाच्या फेसबुक लाईव्हवर सुरु होता, असं चतुर्वेदी यांनी सांगितलं आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “शीतल म्हात्रेंनी सायबर सेलमध्ये तक्रार दिली असून, दोषींना अटक करण्यात येत आहे. राजकीय दबावातून अटकसत्र सुरू आहे. पण, प्रकाश सुर्वेंच्या मुलाच्या फेसबुक लाईव्हवर हा सर्व व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा त्याला अटक करायला पाहिजे.”
“बदनामी केली म्हणून शीतल म्हात्रे रडत आहे. मग, बदनामीची सुरूवात प्रकाश सुर्वेंच्या घरातून झाली होती. पहिल्यांदा त्याला अटक करा. राज सुर्वेच्या अकाऊंटवरून व्हिडीओ आधीच व्हायरल झाला. ते २ तासांचं फेसबुक लाईव्ह डिलीट करण्यात आलं,” असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं.
शिवसेना सत्तासंघर्षावर बोलताना प्रियंका चतुर्वेदींनी सांगितलं, “सर्वोच्च न्यायालय सत्याबरोबर आहे. १० व्या अनुसूचीचं आणि संविधानचं उल्लंघन करण्यात आलं. निवडणूक आयोगाने निराधार, दबावाअंतर्गत पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेतला. यातून संवैधानिक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती लोकशाहीच्या विरोधात होती,” असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.