Priyanka Gandhi अदाणी समूहांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याच्या मागणीवरुन इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. संसदेत आणि संसदेच्या बाहेरही यासंबंधीच्या मागण्या सुरु आहेत. दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) या मोदी अदाणी भाई भाई असं लिहिलेली बॅग संसदेत घेऊन आल्या. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या बॅगेचं कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका गांधींनी आणलेल्या बॅगने वेधलं लक्ष

प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) यांनी संसदेत आणलेल्या बॅगवर एका बाजूला मोदी आणि गौतम अदाणी यांचं व्यंगचित्र आहे तर दुसऱ्या बाजूला मोदी-अदाणी भाई भाई अशी ओळ लिहिली आहे. या ओळीने लक्ष वेधलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार, काँग्रेसचे खासदार या सगळ्यांनीच ही बॅग हातात घेतली होती. संसदेच्या बाहेर घोषणाबाजीही करण्यात आली. पंतप्रधान मोदी सदनात या आणि आरोपांवर उत्तर द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने मात्र या आंदोलनात भाग घेतला नाही. ज्यानंतर भाजपाने इंडिया आघाडी विखुरली आहे असा आरोप केला आहे.

राहुल गांधींची प्रतिक्रिया काय?

राहुल गांधींना जेव्हा कळलं की प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) या अदाणी आणि मोदींबाबतची ओळ लिहिलेली बॅग घेऊन आल्या आहेत तेव्हा त्यांनी या बॅगेचं कौतुक केलं. ही बॅग खूपच क्यूट आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. तसंच ही बॅग कुणी बनवली हे विचारलं तेव्हा प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) खळाळून हसल्या.

प्रियांका गांधी काय म्हणाल्या?

हिवाळी अधिवेशन सुरु होऊन १० दिवस होऊन गेले आहेत. तरीही पंतप्रधान संसदेत आलेले नाहीत. ते कुणापासून तोंड लपवून फिरत आहेत? अदाणींबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी घाबरत आहेत. आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी का आलेले नाहीत? मी तर नव्यानेच खासदार झाले आहे पण मला हा प्रश्न पडला आहे की मोदी संसदेत आलेले का नाहीत? तसंच अदाणींचा मुद्दा आम्ही का उचलायचा नाही? उत्तर प्रदेशातल्या कुठल्याही गावात जा. शेतकऱ्यांना भरमसाठ वीजबिलं येत आहेत. अमेरिकेत अदाणी समूहाच्या विरोधात काय आरोप केले जात आहेत? अदाणींच्या विरोधात चार्जशीट का दाखल झाली आहे? तर अदाणी समूहाने हजारो कोटींची लाच दिली आहे त्यामुळे जनतेच्या वीज बिलात वाढ करता येईल. हा मुद्दा लोकांशी थेट संबंधित आहे आम्ही त्यावर का बोलायचं नाही? असं प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi ) म्हणाल्या.

हे पण वाचा- Priyanka Gandhi: “जय श्रीराम नाही, तर…”, प्रियांका गांधींनी महिला खासदारांना असा सल्ला का दिला? व्हिडीओ व्हायरल

सपा नेते रामगोपाल यादव काय म्हणाले?

समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते रामगोपाल यादव म्हणाले की भाजपाकडून इंडिया आघाडी तुटली आहे असा अपप्रचार केला जातो आहे. प्रत्यक्षात असंं काहीही घडलेलं नाही. जे आंदोलन करण्यात आलं त्याआधी राहुल गांधी यांनी त्यांच्या सहयोगी पक्षांशी चर्चा केली त्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं. लाचखोरीच्या प्रकरणात अदाणी समूहावर जे आरोप अमेरिकेत झाले आहेत, जो गुन्हा दाखल झाला आहे त्यासंबंधी चर्चा करा ही आमची मागणी आहे यामध्ये चुकीचं काय आहे? असाही प्रश्न यादव यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi and opposition leaders attack on modi government priyanka gandhi came with the bag modi adani bhai bhai scj