भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासमोर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जादू फिकी पडत असल्याचे दिसून आल्याने काँग्रेसने दुसरे ‘गांधी कार्ड’ काढले आहे. राहुल यांची बहीण प्रियंका गांधी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीस हजेरी लावून या तर्काला खतपाणी घातले. प्रियंका यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्यात येण्याची शक्यता काँग्रेसमधील सूत्रांनी साफ फेटाळली असली तरी त्या आता राजकारणात अधिक सक्रिय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता राहुल यांच्या निवासस्थानी, १२ तुघलक लेनवर झालेल्या बैठकीत प्रियंका गांधी उपस्थित होत्या. या बैठकीत सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, केंद्रीय मंत्री जयराम रमेश, महासचिव जनार्दन द्विवेदी, प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन आदी उपस्थित होते. आजवर प्रियंका गांधी या रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार करताना दिसल्या. मात्र, काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकांना त्या कधीही हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीनंतर त्यांच्या राजकारणात अधिक सक्रिय होण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नसले तरी चार राज्यांत झालेल्या दारूण पराभवानंतर एकदाही ‘चिंतन’ बैठक न झाल्याबद्दल प्रियंका यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकांतील पराभवामुळे आलेली मरगळ हटवण्यासाठी प्रियंका यांना पुढे करणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह काँग्रेसच्या वर्तुळात आहे. याआधीही अनेकदा प्रियंका यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत.
पंतप्रधानपदाच्या चर्चेचा इन्कार
प्रियंका यांना काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्यात येण्याच्या चर्चेचा काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी इन्कार केला. प्रियंका या आधीपासूनच काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय असून आजच्या त्यांच्या उपस्थितीत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असे ते म्हणाले. ‘त्या काँग्रेसच्या सक्रिय सदस्या आहेत. शिवाय गांधी कुटुंबातील सदस्या आहेत. त्यामुळे त्यांनी बैठक घेतली. याचे वेगवेगळे अर्थ लावू नये,’ असा खुलासा त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा