काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी या देशभरात काँग्रेसच्या प्रचाराला जाणार असल्याच्या बातम्यांचा काँग्रेसने इन्कार केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी सांगितले की, काही लोक व दूरचित्रवाणी वाहिन्या चुकीची माहिती पसरवित असून मध्यप्रदेशातील चेंगराचेंगरीत ११५ जण मरण पावल्याच्या घटनेवरून लक्ष उडवण्यासाठी त्यांचा हा डाव आहे, असे ते म्हणाले.
त्या दुर्घटनेत शंभराहून अधिक लोक मरण पावले व सगळ्या देशाचे लक्ष मध्य प्रदेशकडे वेधले गेले. मध्य प्रदेश सरकारला मंदिराच्या ठिकाणी सुरक्षा पुरवता आली नाही. प्रियांका गांधी या सध्या अमेठी व रायबरेलीत प्रचार करीत आहेत व त्या देशभरात प्रचारासाठी जाणार असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. अशा प्रकारच्या बातम्या देणाऱ्या वाहिन्या व लोकांचा काँग्रेस पक्षाकडून आम्ही निषेध करतो. प्रियांका गांधी या केवळ अमेठी किंवा रायबरेलीत प्रचार करणार नाहीत, तर संपूर्ण देशभरात निवडणुकीच्यावेळी प्रचार करणार आहेत, अशा बातम्या आल्या आहेत त्यावर माकन यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचारासाठी प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याचे प्रयत्न आहेत, असे दळणवळण मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, युपीए २ च्या सकारात्मक बाबी लोकांना सांगण्यासाठी काँग्रेसमधील सर्व जण प्रयत्न करतील यात शंका नाही.