प्रियंका गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘विद्यमान सरकार राज्यघटनेचा अनादर करत असल्याचे अनेक प्रकरणांत दिसून आले आहे. राज्यघटना उद्ध्वस्त करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे,’’ असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रविवारी आसाममध्ये केला.

काँग्रेसच्या उमेदवार सुष्मिता देव यांच्या प्रचारासाठी सिल्चरमध्ये आलेल्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. ‘‘महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे या देशाची पायाभरणी केली. राज्यघटनेचा आदर करणे हे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. मात्र सध्याचे सरकार राज्यघटनेचा अनादर करत असून, राज्यघटना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे,’’ असे प्रियंका म्हणाल्या.

भाजपच्या जाहीरनाम्यावरही प्रियंका यांनी टीका केली. भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त सांस्कृतिक विविधतेला स्थान नसून, त्यात अनेक गोष्टींची उणीव दिसते. मात्र, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबातील गरीब कुटुंबांना वर्षांला ७२ हजार रुपये देणाऱ्या ‘न्याय’ योजनेचा समावेश आहे, असे प्रियंका यांनी सांगितले. मतदान करण्याआधी राजकीय पक्षांचे जाहीरनामे काळजीपूर्वक वाचा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक परदेश दौरे केले.  ते अमेरिका, चीन, रशिया आदी देशांच्या दौऱ्यावर गेले आणि तेथील अध्यक्षांशी गळाभेट घेऊन आले. मात्र पंतप्रधान आपला मतदारसंघ वाराणसीतील एकाही कुटुंबाकडे त्यांच्या परिस्थितीबाबत विचारपूस करण्यासाठी गेले नाहीत, असे प्रियंका म्हणाल्या.

‘भाजप जाहिरातबाजीत माहीर’

गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने चुकीची धोरणे राबवली. भाजप फक्त जाहिरातबाजी करण्यात माहीर आहे. जनतेचा आवाज न ऐकणाऱ्या, त्यांचे प्रश्न न समजणाऱ्या आणि केवळ सत्ता भोगणाऱ्या भाजपचा निवडणुकीत पराभव करा, असे आवाहन प्रियंका यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi on bjp