Priyanka Gandhi Got Praise From Former Pakistan Minister : काँग्रेस नेत्या आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका गांधी सध्या देशभरात चर्चेत आहेत. पण आता प्रियंका गांधींची चर्चा परदेशातही होऊ लागली आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संसद परिसरात प्रियंका गांधी पॅलेस्टाईनवर हल्ल्यांच्या निषेधार्थ ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिलेली बॅग घेऊन आल्या होत्या. यानंतर काहींनी त्यांचे कौतुक केले तर काहीजण त्यांच्यावर टीका करत आहेत. अशात पाकीस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी ‘नेहरूंची पणती’ म्हणत प्रियंका गांधींचे कौतुक केले आहे. यावेळी चौधरी फवाद यांनी पाकिस्तानी खासदारांनी असे कोणतेही धाडस न केल्याने त्यांच्यावर टीका केली आहे.
नेहरूंची पणती…
खासदार प्रियंका गांधींचे कौतुक करताना पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी नेहरूंचाही उल्लेख केला आहे. ते म्हणाले, “जवाहरलाल नेहरूंसारख्या उत्तुंग स्वातंत्र्यसैनिकाच्या पणतीकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो? प्रियंका गांधी ताठ मानेने उभ्या राहिल्या आहेत. आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी संसदेच्या सदस्याने असे धाडस दाखवले नाही याची लाज वाटते. #धन्यवाद.”
प्रियंका गांधीच्या बॅगची चर्चा
प्रियंका गांधी १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत जी बॅग घेऊन गेल्या होत्या, त्यावर ‘पॅलेस्टाईन’ असे लिहिलेले होते. या बॅगवर कापलेल्या कलिंगडाचेही चित्र होते. ज्याला पॅलेस्टीनी संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. पॅलेस्टाईनमधील लोकांना पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर अनेकदा कापलेल्या कलिंगडाचे छायाचित्र किंवा ईमोजी वापरली जाते.
खासदार प्रियंका गांधी यांनी सातत्याने पॅलेस्टाईन आणि गाझामधील पीडितांसाठी आवाज उठवला आहे. प्रियंका यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हाही इस्रायलला लक्ष्य केले होते. तसेच इस्रायलच्या पंतप्रधानांवरही टीका केली होती.
इस्रायल-हमास युद्धात ४६ हजार मृत्यू
दरम्यान १० डिसेंबर २०२४ पर्यंत इस्रायल-हमास यांच्यातील युद्धात ४६ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४४,७८६ नागरिक पॅलेस्टाईनचे आहेत. तर, १,७०६ नागरिक इस्रायलचे आहेत. दुसरीकडे सुमारे १५० पत्रकार आणि २२४ मानवतावादी मदत कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.
भाजपाची प्रियंका गांधींवर टीका
भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘पॅलेस्टाईन’ बॅगेवरून खासदार प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना पात्रा म्हणाले, “जोपर्यंत गांधी कुटुंबातील सदस्यांचा प्रश्न आहे, तो काही नवीन नाही. अगदी नेहरूंपासून प्रियंका वड्रापर्यंत, गांधी घराणे तुष्टीकरणाची पिशवी घेऊन फिरत आहे.”