उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या लखीमपूर खेरी घटनेनंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची तयारी केली आणि पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हापासून राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी सातत्याने उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आता प्रियांका गांधी यांच्या हातातल्या झाडूवरून दोन्ही बाजूंनी टीका-टिप्पणी होताना दिसत आहे. सीतापूर गेस्ट हाऊसमध्ये प्रियांका गांधी यांना ठेवण्यात आल्यानंतर तिथे त्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याची छायाचित्र समोर आली होती. त्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा प्रियांका गांधींनी हातात झाडू घेतला आहे.
लखीमपूर घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून सीतापूर इथल्या गेस्टहाऊसवर काही काळ ठेवलं. या काळात प्रियांका गांधींनी गेस्ट हाऊसमधली खोली झाडून स्वच्छ केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खोचक शब्दांत टीका करताना प्रियांका गांधींवर निशाणा साधला होता.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
झाडू मारतानाचा प्रियांका गांधींचा फोटो व्हायरल होत असल्याबाबत योगी आदित्यनाथ यांना विचारणा केली असता ते म्हणाले, “काँग्रेस नेत्यांना तेवढंच करण्याच्या उपयोगाचं ठेवायची जनतेची इच्छा आहे. आणि तेच जनतेनं त्यांना करायला लावलं आहे. या लोकांना उपद्रव करणं आणि नकारात्मकता पसरवणं यापेक्षा दुसरं काम उरलेलं नाही.” योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर त्यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींनी पुन्हा एकदा हातात झाडू घेऊन लखनौमधील वाल्मिकी मंदिरात साफसफाई केली. त्यासंदर्भात लखनौमधल्या लवकुश नगरमध्ये बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, “असं बोलून योगी आदित्यनाथ यांनी फक्त माझाच नाही तर तुम्हा सगळ्यांचा अपमान केला आहे. कारण कोट्यवधी दलित बंधू-भगिनी सफाई कर्मचारी आहेत आणि ते हे काम करतात.” मुख्यमंत्र्यांच्या याच विधानामुळे आपण हातात झाडू घेऊन वाल्मिकी मंदिरात साफसफाईचा निर्णय घेतला, कारण मला योगी आदित्यनाथ यांना हे दाखवायचं होतं की या कामात चुकीचं असं काहीच नाही, असं देखील प्रियांका गांधींनी नमूद केलं.