Priyanka Gandhi Defends Rahul Gandhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा विविध मुद्द्यांनी गाजला. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर गुरुवारी इंडिया आघाडीच्या दोन्ही सभागृहातील खासदारांनी संसद भवन परिसरात, अमित शाह यांच्या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी पदयात्रा काढली. यावेळी मकरद्वारापाशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार समोरासमोर आल्याने त्यांच्यात धक्काबुकी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत भाजपाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. यानंतर राहुल गांधी यांच्या बहीण खासदार प्रियांका गांधी यांनी राहुल गांधी यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

काल संसदेत मकरद्वारापाशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत प्रियांका गांधी यांना विचारण्यात आले. याला उत्तर देताना वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या, “मी त्यांची बहीण आहे. इतक्या वर्षांपासून मी त्यांना ओळखते. ते असे कृत्य कधी करू शकत नाहीत.”

भाजपाकडून राहुल गांधींविरोधात पोलीस तक्रार

संसदेत झालेल्या धक्काबुक्कीनंतर खासदारांना झालेल्या दुखापतीमुळे भाजपाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, बन्सुरी स्वराज यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा वगळता इतर गुन्हे दाखल केले आहेत.

हे ही वाचा : “कठोर कायदे महिलांच्या हितासाठी, पतीला धमकावण्यासाठी किंवा पिळवणूक करण्यासाठी नाही”, पोटगी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

u

भाजपा खासदाराचे आरोप

ओडिशाच्या बालासोरचे खासदार असलेल्या प्रताप चंद्र सारंगी यांनी, राहुल गांधींनी ज्या खासदाराला ढकलले तो खासदार अंगावर पडल्याने आपल्याला दुखापत झाल्याचा आरोप केला आहे. सारंगी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, खासदार मुकेश राजपूतही जखमी झाले आहेत. या दोन्ही खासदारांना राम मनोहर लोहीया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केलेले सर्व आरोप राहुल गांधी यांनी नाकारले आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनीही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka gandhi rahul gandhi bjp mp pushing allegations rajya sabha loksabha winter session aam