लोकसभेसाठी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात प्रचार करण्यासाठी प्रियांका गांधींनी तयारी दर्शविली आहे. प्रियांका गांधी यांनी पक्षात महत्वपूर्ण जबाबदारी स्विकारावी अशी मागणी सातत्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. त्यामुळे येणा-या काही दिवसांत सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असणारा अमेठी आणि राहुल गांधींच्या रायबरेली मतदारसंघात प्रियांका गांधी प्रचार करताना दिसतील. सध्या प्रियांका अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील प्रचारावर लक्ष केंद्रित करणार असल्या तरी या दोन मतदासंघांच्या सीमा ओलांडून त्यांनी उर्वरित मतदारसंघाकडेसुद्धा लक्ष द्यावे अशी मागणी आता पक्षात जोर धरू लागली आहे. गुरूवारी दिल्लीत मतदान केल्यानंतर अमेठी आणि रायबरेलीमध्ये आपले पती रॉबर्ट वडेरा यांच्यासह प्रचार करणार असल्याची माहिती प्रियांका गांधींनी दिली. दरम्यान आगामी काळात काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर महत्वपूर्ण जबाबदारी देणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी पक्षातील काही महत्वाच्या नेत्यांबरोबर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रियांका गांधी उपस्थित होत्या.