नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे. काँग्रेसने लोकसभेची सेमीफायनल जिंकल्याची चर्चा असतानाच. राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती समोर येते आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी प्रियंका गांधी पोहचल्या आहेत तसेच सोनिया गांधीही या ठिकाणी गेल्या आहेत असेही समजते आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे, तर मध्यप्रदेशात कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते.

या दोन्ही निर्णयांमुळे सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया नाराज असल्याचे समजते आहे. त्यामुळेच या दोघांचे समर्थक विरूद्ध इतर काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात वाद सुरु असल्याचेही समजते आहे. आता या वादावर कसा तोडगा काढला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कमलनाथ यांचं नाव निश्चित झाल्याने मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया कार्यकर्ते नाराज झाल्याचे समजते आहे. उत्तरेत भोलेनाथ मध्यप्रदेशात कमलनाथ अशाही घोषणा दिल्या जात आहेत. अशात ज्योतिरादित्य सिंधिया यांना मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. राजस्थानातही सचिन पायलट यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या चांगल्या यशाची चर्चा देशभरात सुरु असतानाच मध्यप्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेली अंतर्गत बंडाळी समोर आली आहे. आपल्या नेत्याला मुख्यमंत्री न केल्याने एका काँग्रेस नेत्याचे कार्यकर्ते दुसऱ्या काँग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यांवर नाराज झाले आहेत.

Story img Loader