अमेठी : लोकसभा निवडणुकीत अमेठीचा निकाल खरे तर सरळसोट असायचा. काँग्रेसचा बालेकिल्ला, त्यातही गांधी घराण्याचा मतदारसंघ म्हणून देशभरात अमेठीची ओळख आहे. तिथे काँग्रेसला जीव तोडून प्रचार करण्याची गरज नसे. मात्र मागील निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी ‘जायंट किलर’ ठरल्या आणि त्यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींसारख्या मातब्बर नेत्याचा ५५ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
गेल्या पाच वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यामुळे यंदा अमेठीतून इराणींविरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांच्या विजयासाठी खुद्द प्रियंका गांधी प्रचंड मेहनत घेत आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे काही तास असताना शर्मा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, त्याबरोबरच मागील पराभवानंतर राहुल गांधी आता अमेठीत परत येणार नाहीत हेही स्पष्ट झाले. ते शेजारील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे. त्यातच भाजपने गेल्या वेळी येथे विजय मिळवला होता. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होणे अपेक्षित होते, पण तसे होताना दिसत नाही. लोक एकीकडे राम मंदिर, मोदी घटक इत्यादींवर चर्चा करतात आणि दुसरीकडे प्रियंका गांधींच्या तुफानी प्रचाराने इराणींसाठी लढत अजिबात सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमेठीचा बाह्य भाग असलेल्या जैसच्या वहाबगंज बाजारपेठेत शिवणकाम दुकानाचे मालक अहमद मकसूद सांगतात की, ‘‘जर स्वत: राहुल गांधी येथून निवडणूक लढवत असते तर गोष्ट वेगळी असती. या वेळी मतदारांच्या मनाचा कल सांगता येणे कठीण आहे. आपण कोणाला पाठिंबा देत आहोत हे कोणीही बोलत नाही पण हा गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला आहे.’’ तर याच बाजारपेठेत गळ्यात ‘जय श्रीराम’चा स्कार्फ घेतलेले अमरनाथ शर्मा म्हणाले की, ‘‘५०० वर्षांच्या संघर्षानंतर राम मंदिर बांधले आहे. आमचे मत राम मंदिराला आणि भाजपला आहे. उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही.’’
प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किशोरीलाल शर्मा आणि स्मृती इराणी असले तरी सर्वांचे लक्ष प्रियंका गांधी यांच्याकडेच आहे. काँग्रेससाठी आणि विशेषत: गांधी कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने प्रियंका यांनी आघाडीवर राहून अथकपणे प्रचार केला आहे. इराणी यांना अमेठीच्या विकासाशी काहीही मतलब नाही, केवळ राहुल गांधी यांचा पराभव करण्याच्या एकमेव उद्देशानेच त्यांनी या मतदारसंघाची निवड केली अशी टीका प्रियंका गांधी यांनी प्रचारात अनेकदा केली. एका प्रकारे या निवडणुकीला स्मृती इराणी विरुद्ध राहुल आणि प्रियंका असे स्वरूप आले आहे. किशोरीलाल शर्मा उर्वरित देशासाठी अपरिचित नाव असले तरी, अमेठीमधील जनतेला ते अनोळखी नाहीत. ते गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते आणि गांधी घराण्याचे निष्ठावान म्हणून काम करत आहेत. प्रचारादरम्यान ते सांगत असत की, ‘‘जर मी खासदार म्हणून निवडून आलो तर, मी गांधी कुटुंबाची अमानत सुरक्षित ठेवेन. विश्वासघात करणार नाही.’’ माझा विजय हा गांधी कुटुंबाचाच विजय असेल असेही ते आवर्जून सांगत असत.