आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी पक्ष समर्थपणे उभा असल्याचे चित्र सगळीकडे पहायला मिळत आहे. ही परिस्थिती पाहता कॉंग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून पक्षातील काही जेष्ठ नेते राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवू लागले आहेत. परंतू राहुल गांधी यांचा करिष्मा अद्याप दिसत नाहिए. त्यामुळेच पुन्हा एकदा प्रियांका गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, कॉंग्रेसने या वृत्ताचा इन्कार केला आहे.
काही वृत्तवाहिन्यांनी, प्रियांका गांधी आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार करणार अशा बातम्या देण्यास सुरूवात केली आहे. मात्र, कॉंग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. प्रियांका गांधी आपली आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या राय बरेली आणि अमेठी या मतदारसंघातच प्रचार करणार असल्याचेही त्य़ांनी स्पष्ट केले.    
नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठीची घोषणा झाली असली तरी राहुल गांधी यांच्या नावाची कॉंग्रेस पक्षाकडून औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, सध्या सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकमेकांवर प्रहार करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे ही निवडणुक या दोघांमुळेच गाजणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे.
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या आठवड्यात नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील कानपूर येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फो़डणार आहेत.