पीटीआय, नवी दिल्ली
काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेलीची जागा कायम ठेवणार असून वायनाडची जागा त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी लढवितील, असे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सोमवारी जाहीर केले. या माध्यमातून प्रियंका प्रथमच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाले होते. त्यांना नियमानुसार एक जागा सोडावी लागणार असल्याने त्यावर विचारमंथन करण्यासाठी सोमवारी येथे पक्षांतर्गत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला राहुल, प्रियंका, खरगे यांच्यासह माजी पक्ष्याध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. या बैठकीत प्रियंका गांधी यांना वायनाडची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय आपल्यासाठी कठीण होता. आपले त्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होणार नसून उलट आता वायनाड आणि रायबरेली या मतदारसंघांना प्रत्येकी दोन खासदार मिळतील, असे ते म्हणाले.