पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अचानक केलेल्या घोषणेने संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी देशाला संबोधित करताना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे अनेक दिवस सर्वसामान्यांना पैशांसाठी बँकांबाहेर रांगा लावाव्या लागल्या. त्यानंतर आता काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी नोटाबंदीला पाच वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. नोटाबंदी यशस्वी झाली तर भ्रष्टाचार का संपला नाही? असा सवालही प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

नोटाबंदी ही ‘आपत्ती’ असल्याचे वर्णन करून प्रियंका गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. “नोटाबंदी यशस्वी झाली असेल तर… भ्रष्टाचार का संपला नाही? काळा पैसा का परत आला नाही? अर्थव्यवस्था कॅशलेस का झाली नाही? दहशतवाद का संपत नाही? महागाई नियंत्रणात का नाही?”, असे प्रश्न प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारले आहेत.

तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करत आहेत. विरोधकांनी नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले होते. मात्र, देशात सध्या असलेला काळा पैसा आणि बनावट नोटांच्या समस्येतून सुटका करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी असे  म्हटले आहे. “काश्मीरमध्ये सर्वात जास्त दहशतवाद वाढला आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार गेल्या पाच वर्षामध्ये वाढला आहे. त्यामुळे नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या संकट आल्याने शेकडो लोकांना प्राण आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Story img Loader