Priyanka Gandhi Speech in Lok Sabha : केरळच्या वायनाड येथून मोठा विजय मिळवत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या पहिल्यांदाच संसदेत पोहचल्या आहेत. यानंतर त्यांनी आज संसदेत आपले पहिले भाषण केले. प्रियांका गांधी यांनी त्यांच्या भाषणात वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी संसदेतील रखडलेल्या चर्चेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
प्रियांका गांधी त्यांच्या भाषणात म्हणाल्या की, “देशातील राजकीय आणि सामाजिक स्थितीवर बोलताना आपल्या भाषणात प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज जनतेला खरे बोलण्यापासून घाबरवले, धमकावले जात आहे. पत्रकार, विरोधी पक्षाचा नेता असो की एखाद्या विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी-कामगार संघटनांना गप्प बसवले जात आहे. कोणावर ईडी तर कोणावर सीबीआय यांच्या माध्यामातून खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरूंगात टाकले जाते. विरोधकांना तुरूंगात टाकून त्रास दिला जात आहे. या सरकारने कोणाला सोडले नाही. यांनी देशातील वातावरण भीतीने भरून टाकले आहे. यांची मिडियाची मशीन खोटी माहिती पसरवते आणि वेगवेगळे आरोप करते. पण कदाचित ती देखील भीतीखालीच जगत आहेत.”
प्रियांका गांधींनी सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा करण्याची हिंमत नसल्याचा दावा केला आहे. देशातील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, “मी आठवण करून देऊ इच्छिते की असे वातावरण देशात इंग्रजांच्या काळात होते. जेव्हा या बाजूला बसलेले गांधींच्या विचारधारेचे लोक स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि त्या बाजूच्या विचारधारेचे लोक भीतीमध्ये राहून इंग्रजांबरोबर हातमिळवणी करत होते. पण भीतीचा देखील आपला एक स्वभाव असतो, भीती पसरवणारे देखील स्वत: भीतीचे लक्ष्य ठरतात. हा निसर्गाचा नियम आहे. हे भीती पसरवण्याची यांना इतकी सवय झाली आहे की तेच भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. हे (सत्ताधारी) चर्चेला आणि टीकेला घाबरतात. आम्ही किती दिवसांनी चर्चा करण्याची मागणी करत आहोत, पण यांच्यात चर्चा करण्याची हिंमतच नाही”.
पण राजाकडे हिम्मत नाही..
सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडे टीका ऐकून घेण्याची हिम्मत नसल्याचेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या. यासाठी त्यांनी एक उदाहरण देखील दिले. त्या म्हणाल्या की, “एक गोष्ट सांगितली जात असे की, राजा वेषांतर करून बाजारात टीका ऐकण्यासाठी जात असे. प्रजा माझ्याबद्दल काय बोलतेय? मी योग्य मार्गावर चालतोय की नाही? हे ऐकण्यासाठी राजा बाजारात जात असे. पण आजचा राजा वेषांतर तर करतो. वेषांतर करण्याचा त्यांना शौक तर आहे, पण त्यांच्याकडे ना लोकांमध्ये जाण्याची हिम्मत आहे, ना टीका ऐकून घेण्याची”, असा टोला प्रियांका गांधी यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदी यांना लगावला.
“मी तर सभागृहात नवीन आहे, फक्त १५ दिवसांपासून येत आहे. पण मला नवलं वाटतं की १५ दिवसात इतके मोठमोठे मुद्दे आहेत, पण पंतप्रधान फक्त एका दिवशी १५ मिनिटांसाठी दिसले आहेत”, असेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.