पीटीआय, वायनाड
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा त्यांचा भाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह ३ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी पर्वतीय भागात जनसभा आणि सभांद्वारे प्रचार अभियान प्रारंभ करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेल्या प्रियंका गांधी ७ नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार आहेत.
प्रियंका गांधी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राहुल गांधी यांच्यासह मनंतवाडी येथील गांधी पार्कमध्ये संयुक्त सभेला संबोधित करतील आणि त्याच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी समर्थकांच्या भेटीगाठी घेतील. प्रचार अभियानांतर्गत राहुल गांधी एरीकोड येथील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. प्रियंका गांधी ४ नोव्हेंबर रोजी कलपेट्टा आणि सुल्तान बाथरी विधानसभा मतदारसंघातील पाच ठिकाणी होणाऱ्या सभांना संबोधित करणार आहेत.
हेही वाचा :Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
विरोधकांची टीका
दरम्यान, ५, ६ आणि ७ नोव्हेंबरचा प्रचाराचा कार्यक्रम नंतर जाहीर केला जाईल, असे पक्षातर्फे सांगण्यात आले. प्रियंका गांधी मतदारसंघात पाहुणे म्हणून येणार आणि जाणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.