प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाल्यानंतर आता त्यांचा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये समावेश करण्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच त्या केवळ पूर्व उत्तर प्रदेशात नाही तर संपूर्ण भारतात काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करतील असे संकेतही देण्यात आले आहेत. प्रियंका गांधी या इंदिरा गांधींसारख्या दिसत असल्यामुळे तसेच त्यांची भाषणशैली आक्रमक असल्यामुळे मतदारांवर त्यांचा चांगला प्रभाव पडेल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
गेल्याच आठवड्यात त्यांच्यावर पू्र्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली तसेच त्यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. लोकसभेचे बजेट अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात येईल अशी सूत्रांची माहिती असून त्यावेळीच प्रियंकांच्या काँग्रेसच्या प्रचार कार्यक्रमातील सहभागाची माहिती दिली जाईल असे वृत्त आहे. राहुल गांधींनंतर काँग्रेस पक्षातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्या प्रियंका असतील हे स्वाभाविक आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत प्रियंकांचा परीचय सर्व कार्यकारी सदस्यांशी करून देण्यात येईल आणि प्रियंकांचं स्थान अधोरेखीत करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.
सध्या प्रियंका विदेश दौऱ्यावर असून त्या लवकरच परततील आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा जबाबदारी स्वीकारण्याचा औपचारीक जाहीर कार्यक्रम होईल असे सांगण्यात येत आहे. प्रियंकांचा वावर पूर्व उत्तर प्रदेशपुरता मर्यादित असेल का यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रियंकांचं कार्यक्षेत्र पूर्व उत्तर प्रदेशपुरता मर्यादित नसून त्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचा प्रचार करतील असं सांगितल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
काँग्रेसचा महासचिव हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षेत्र प्रचार समितीचा सदस्य असतो त्यामुळे ज्या ज्या राज्यांमधून मागणी असेल त्या त्या राज्यांमध्ये प्रियंका प्रचारासाठी जाऊ शकतील असे आझाद म्हणाले. आझाद हे काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असून प्रियंकांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देशभरात पक्षाचं कार्य करावं हे अत्यंत स्वाभाविक असल्याचं आझाद म्हणाले आहेत. भारत हा भोगोलकदृष्ट्या प्रचंड मोठा देश असल्यानं पक्षाच्या अध्यक्षावर केवळ प्रचारासाठी विसंबून न राहता अन्य महत्त्वाच्या नेत्यांनीही देशात प्रचार करणं स्वाभाविक असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे प्रियंका गांधींची येत्या लोकसभा निवडणुकीतील भूमिका केवळ उत्तर प्रदेशात प्रचार करण्याची राहणार नसून त्या देशभरात दौरे करतील असे संकेत मिळाले आहेत.