Khalistani Protest: खलिस्तानी समर्थकांनी भारताविरोधात जगभरातील विविध देशांमध्ये भारताविरोधात आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, शीख फॉर जस्टीस (एसएफजे) या संघटनेकडून यूकेमधी विविध देशांत ‘किल मोदी पॉलिटिक्स’ हे अभियान राबविले जाणार होते. त्याप्रमाणे आता मागच्या दोन दिवसांत ठिकठिकाणी असे आंदोलन होत आहेत. २८ डिसेंबर रोजी वॉशिंग्टन डीसी येथे खलिस्तानवाद्यांनी आंदोलन करत किल मोदी पॉलिटिक्स असे फलक झळकवले होते. त्यानंतर आता लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेरही याच प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे.
टाइम्स नाऊ न्यूजने लंडनमधील आंदोलनाची बातमी दिली आहे. या वृत्तानुसार, उच्चायुक्तालयाबाहेर जमलेल्या खलिस्तानी समर्थकांनी खलिस्तान राष्ट्राची मागणी केली आहे. ही मागणी करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये खलिस्तान्यांनी किल मोदी पॉलिटिक्स आणि त्यांच्या राजकीय मागण्यांचे फलक हाती घेतलेले दिसत आहेत.
भारतीय उच्चायुक्तलयाने मात्र अद्याप या आंदोलनाच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलनानंतर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हरदीपसिंग निज्जरची हत्या आणि भारताने खलिस्तानी चळवळीविरोधात कडक पावले उचलल्यानंतर खलिस्तान समर्थकांकडून विदेशांतील देशांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. उच्चायुक्तालयाची तोडफोड, हिंदू मंदिरांची विटंबना असे अनेक प्रकार विदेशात घडत आहेत.
नोव्हेंबर महिन्यातच कॅनडामधील ब्रॅम्प्टन येथे हिंदू सभा मंदिराबाहे खलिस्तान समर्थकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळला होता. हिंदू भाविकांना यावेळी मारहाण झाल्याचे व्हिडीओही समोर आले होते. या घटनेनंतर भारतीय उच्चायुक्तालयाने ४ नोव्हेंबर रोजी निवेदन जाहीर करत नाराजी व्यक्त केली होती.