Pakistan Zindabad Slogan in Bihar : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर बिहारमधील एका घटनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून त्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याचं दिसून येत आहे. पण यासंदर्भात पोलिसांनी संबंधित व्हिडीओची रीतसर तपासणी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?

भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात CPI च्या कार्यकर्त्यांनी रविवारी बिहारच्या लाखीसराय भागात मोर्चाचं आयोजन केलं होतं. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये सीपीआयचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याच मोर्चामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला. हा व्हिडीओ राष्ट्रीय जनता दलातर्फे आयोजित मोर्चामधील असल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात आला. मात्र, पोलीस तपासात व्हिडीओमागचं सत्य समोर आलं.

काय आहे Video चं सत्य?

लाखीसरायचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. “आमच्या तपासादरम्यान आम्हाला ही बाब स्पष्ट झाली की त्या संपूर्ण मोर्चामध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशीच घोषणा दिली जात होती. दहशतवादाविरोधात एकता दर्शवण्यासाठीच त्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण एका ठिकाणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा एका व्यक्तीने एकदा दिली गेल्याचं दिसून आलं. त्यानंतर लागलीच इतरांनी चूक लक्षात आणून देऊन ती सुधारली”, असं ते म्हणाले.

मात्र, एकदा दिलेली घोषणा वारंवार लूपवर दाखवून एडिट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यातून एकदाच दिलेली घोषणा अनेकदा दिली गेल्याचा भास निर्माण करण्यात आला, असंही पोलिसांनी सांगितलं.

संबंधित व्यक्तीला अटक, पक्षातून निलंबित

दरम्यान, सदर घोषणा देणाऱ्या व्यक्तीचं नाव कैलाश प्रसाद सिंह असं असून ते ६६ वर्षांचे आहेत. पोलिसांनी कैलाश सिंह यांना अटक केली असून सीपीआयनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. संबंधित व्यक्तीने चुकून तशी घोषणा दिली असावी, अशी भूमिका सीपीआयकडून मांडण्यात आली आहे. शिवाय, सदर व्हिडीओ कुणी एडिट करून वारंवार घोषणा दिल्या गेल्याचा भास निर्माण केला, याचाही शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.