वेगळ्या तेलंगणाच्या मागणीसाठी तेलंगणा राष्ट्र समितीच्या दोन आमदारांनी शुक्रवारी नाट्यमय आंदोलन केले. हैदराबादमधील आंध्र प्रदेश विधानसभेच्या इमारतीवर चढून त्यांनी वेगळ्या तेलंगणाचा निर्णय तातडीने न घेतल्यास जीव देण्याची धमकी दिली. आमदारांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे विधानसभा परिसरात पोलिसांची आणि सुरक्षारक्षकांची पळापळ झाली.
के. सम्मया आणि डी. विनय भास्कर अशी या दोन आमदारांची नावे आहेत. त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन विधानसभेच्या जी-१ इमारतीच्या गच्चीवर प्रवेश केला. तिथूनच त्यांनी वेगळ्या तेलंगणाचा निर्णय तात्काळ घेण्याची मागणी केली. त्याचबरोबर ‘चलो असेंम्ब्ली’ आंदोलनातील ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची तातडीने सुटका करण्याची मागणीही या दोन्ही आमदारांनी केली. विधानसभेच्या सुरक्षारक्षकांनी सुमारे एक तासानंतर या दोन्ही आमदारांना खाली उतरवले.
तेलंगणा राष्ट्र समितीच्या अन्य काही आमदारांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे विधानसभा परिसरात दहन केले. दरम्यान, या सगळ्या गोंधळामुळे आंध्र प्रदेश विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा