भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीगीरांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतर आता सरकारने चर्चेच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्याशी चर्चा केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात १५ जूनपर्यंत चौकशी पूर्ण केली जाईल असं महत्त्वाचं आश्वासन अनुराग ठाकूर यांनी दिलं आहे. या बैठकीत विनेश फोगाट नव्हती कारण ती हरियाणाला पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी गेली होती.
अनुराग ठाकूर यांनी काय सांगितलं?
“अनुराग ठाकूर म्हणाले की चांगल्या वातावरणात कुस्तीगीरांशी चर्चा झाली. जे आरोप लावण्यात आले आहेत त्याची चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होईल. कुस्तीगीरांविरोधात जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. त्यावरही आम्ही विचार करतो आहोत. आमची चर्चा योग्य पद्धतीने झाली आहे आणि अत्यंत गांभीर्याने आम्ही सगळा हा विषय घेतला आहे. तसंच WFI च्या अध्यक्षपदाची निवड ३० जूनला पार पडणार आहे. ” असं अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलं. तसंच ते म्हणाले आमच्या मध्ये सहा तास चर्चा झाली. आम्ही त्यांना हे आश्वासन दिलं आहे की ब्रिजभूषण यांच्याविरोधातली चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होईल. एका विशेष समितीची स्थापना आम्ही करतो आहोत. याच्या प्रमुख एक महिला असतील. तसंच ब्रिजभूषण यांना तीनदा WFI चं प्रमुखपद देण्यात आलं आहे त्यामुळे आता त्यांची निवड होऊ नये आम्ही ही अटही मान्य केली आहे असंही ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
१५ जून पर्यंत कुस्तीगीरांचं आंदोलन स्थगित
१५ जून पर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित करतो आहोत असं बजरंग पुनियाने ANI ला सांगितलं. बजरंग पुनियाने हे देखील सांगितलं की, “सरकारने आम्हाला आश्वासन दिलं आहे, ब्रिजभूषण यांच्याविरोधातली चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे आम्ही १५ जूनपर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र १५ जूनपर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही आमचं आंदोलन नव्याने सुरु करु. तसंच आमच्या विरोधात जे गुन्हे दाखल आहेत ते देखील मागे घेतले जातील असंही आश्वासन देण्यात आल्याचं बजरंग पुनियाने स्पष्ट केलं.