कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरावर टाकलेल्या धाडीमध्ये कोट्यांवधींची बेहिशोबी मालमत्ता सापडली असून ही संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. संपूर्ण देशभरात या कारवाईची चर्चा आहे. सोमवारी तब्बल १२० तासांनी ही कारवाई संपली तेव्हा जैन यांच्या घरामधून एकूण २३ किलो सोनं सापडलं आहे. कानपूर आणि कन्नौज येथील अत्तराचे व्यापारी असणारे जैन यांचा संबंध सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणातही असल्याचं संशय व्यक्त केला जातोय.
२३ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा, बिस्कीटं…
पियूष जैन यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या विटा आणि बिस्कीटं आढळून आली आहेत. त्यामुळेच हे सर्व सोनं तस्करी करुन, यंत्रणांच्या नजरेआडून आणण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. जीसीएटी इंटेलिजन्सच्या म्हणजेच डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांना पियूष जैनच्या घरात सापडलेलं २३ किलो सोनं हे दुबईवरुन तस्करी करुन आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पियूष जैनच्या बेहिशेबी मालमत्तेचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत आणि सोन्याच्या तस्करीपर्यंत जोडले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. यापैकी बऱ्याच सोन्याच्या गोष्टींवर हे सोनं परदेशातील असल्याचं चिन्हांकित करण्यात आलं आहे.
दुबई कनेक्शन असल्याची शक्यता…
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीजीजीआयच्या विंगने हे प्रकरण महसूल गुप्तचर संचालनालयाकडे म्हणजेच डीआरआयकडे सोपवलं आहे. पियूष जैनच्या विरोधात सलग सहा दिवसांपासून कारवाई अगदी सोमवारपर्यंत (२७ डिसेंबर २०२१ पर्यंत) सुरु होती. डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे की, पियूष जैनच्या कानपूरमधील घरात मिळालेलं सोनं हे दुबईवरुन आणण्यात आलंय. दुबईमध्ये सोन्यावर कर आकारला जात नाही. त्यामुळे याच देशामधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होते. त्यामुळेच पियूष जैननेही आपला काळा पैसा सोन्यात गुंतवण्यासाठी या तस्करीच्या सोन्याच्या मार्गाचा वापर केल्याची शक्यता तपास यंत्रणांना वाटतेय.
वेगळा गुन्हा दाखल होणार…
आता डीआरआयच्या टीमकडून हे सोनं नक्की कुठून आलं आहे याचा माग काढला जाईल. हे सोनं तस्करी करुन आणण्यात आलं का याचा तपास केला णार आहे. हे सोननं आणण्यामागे एखादी यंत्रणा आहे का? या सोन्यावरील कस्टम ड्युटी भरण्यात आली होती का?, या सारख्या गोष्टींचा तपास केला जाणार आहे. पियूष जैनने एवढ्या मोठ्याप्रमाणात सोनं नक्की कोणाकडून आणि कधी घेतलं याचाही शोध घेतला जाणार आहे. यामध्ये पियूष जैनला समाधानकारक माहिती आणि कागदपत्रं सादर करता आली नाही तर त्याच्याविरोधात आणखीन एक गुन्हा दाखल केला जाईल.
तर कठोर कारवाई होणार…
कस्टमशीसंबंधित कायद्यांचं उल्लंघन झालं की डीआरआयकडून अशा प्रकरणांमध्ये नव्याने गुन्हा दाखल केला जातो. गुन्हा दाखल करुनच डीआरआयकडून तपास केला जातो. झोनल यूनिटने केलेल्या तपासाच्या अहवालावर डीआरआयच्या मुख्य कार्यालयामधून या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्यासंदर्भातील हिरवा कंदील दाखवला जातो.
संपत्तीच्या दुबई कनेक्शनची शक्यता यामुळे अधिक…
मागील सहा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये २५७ कोटींची रोख रक्कम सापडली असून एकूण १६ संपत्तींसंदर्भातील माहिती मिळाली आहे. कारवाईदरम्यान काही कागदपत्रं सापडली असून यानुसार पियूष जैन यांच्याकडे १६ महागड्या संपत्ती आहे. यामधील ४ कानपूर, ७ कनौज, २ मुंबई आणि १ दिल्लीत आहे. विशेष म्हणजे दोन संपत्ती दुबईत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हेच दुबई कनेक्शन वापरुन त्याने सोन्याची तस्करी केल्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.