बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींच्या डोक्यावर ‘भूकंप’ लिहलेले स्टिकर लावल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश बिहार सरकारकडून बुधवारी देण्यात आले. दरभंगा जिल्ह्याचे पालकमंत्री बैद्यनाथ सहानी यांनी मंगळवारी रात्री उशीरा या रूग्णालायला भेट दिल्यानंतर सर्वत्र याप्रकरणाची चर्चा होऊ लागली होती. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिली असल्याची माहिती सहानी यांनी पत्रकारांना दिली. याप्रकरणाचा अहवाल आल्यानंतर जे दोषी आढळतील, त्यांना कडक शासन केले जाईल, असे आश्वासनही बैद्यनाथ सहानी यांनी दिले.
जखमींच्या माथ्यावर भूकंप लिहलेले स्टिकर लावण्यात आल्याचा प्रकार समजल्यानंतर मी त्या रूग्णालयाला भेट दिली. मात्र, मी त्याठिकाणी जाईपर्यंत ते स्टिकर काढून टाकण्यात आले होते. भूकंपाच्या धक्क्यात जखमी झालेल्या या रूग्णांना वेगळ्या वॉर्डात ठेवण्यात आले होते आणि त्यांच्या डोक्यावर भूकंप असे लिहलेले स्टिकर चिटकविण्यात आल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी कालपासून उचलून धरला होता. मात्र, या सगळ्याचा गवगवा होऊ लागताच  हे स्टिकर्स काढून टाकण्यात आले. मात्र, काही जखमींनी दिलेल्या माहितीनूसार त्यांच्या डोक्यावर असे स्टिकर लावण्यात आले होते आणि त्यामुळे त्यांना खूप वेदनाही झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी रूग्णालय प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून, भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी हा प्रकार अपमानास्पद असल्याचे सांगितले. त्यांच्या माथ्यावर अशाप्रकारची स्टिकर्स लावायला ते काही तुरूंगातील कैदी नव्हते. त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या खाटेवर विशिष्ट रंगाची खूण करण्याचा पर्याय रुग्णालय प्रशासनाने वापरायला हवा होता, असेदेखील मोदी यांनी म्हटले.