देशातील तीन आघाडीच्या खासगी बॅंकांमध्ये काळ्या पैशाचे रुपांतर पांढऱया पैशात केले जात असल्याचा आरोप ‘कोब्रापोस्ट’ने स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने केल्यानंतर या तिन्ही बॅंकांच्या चौकशीला सुरुवात झालीये. तिन्ही बॅंकांवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांची केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेकडून संयुक्तपणे चौकशी करण्यात येते आहे, अशी माहिती वित्तसेवा विभागाचे सचिव राजीव टक्रू यांनी एका वृत्तवाहिनीली दिली. दरम्यान, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस या तिन्ही बॅंकांवर करण्यात आलेले गैरव्यवहाराचे आरोप खरे ठरले, तर देशातील खासगी बॅंकांचा विकास मंदावण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली.
रिझर्व्ह बॅंक या तिन्ही बॅंकांकडून आवश्यक माहिती जमवत आहे आणि आम्ही तिन्ही बॅंकांच्या संपर्कात आहोत, एवढेच मी आत्ता सांगू शकतो, असे रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गर्व्हनर उर्जित पटेल यांनी पत्रकारांना सांगितले. आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस या तिन्ही बॅंकांनीही अंतर्गत चौकशीस तातडीने सुरुवात केलीये.
कोब्रापोस्ट या वृत्तसंकेतस्थळाचे प्रमुख अनिरुद्ध बहल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या बॅंकांच्या गैरव्यवहारांबद्दल माहिती दिली होती. संबंधित बॅंकांचे केलेले चित्रीकरणही त्यांनी आपल्या संकेतस्थळावर ठेवले आहे. या वृत्तानंतर देशातील आर्थिक जगतात खळबळ उडाल्याचे चित्र होते.

Story img Loader