मागण्या मान्य न झाल्यास कामकाज होऊ न देण्यावर ठाम असलेल्या कॉंग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. राज्यसभेमध्ये विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, लोकसभेमध्ये विरोधकांच्या घोषणाबाजीबद्दल अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही काय करताय, हे देशातील लोकांना बघू द्या, असे सांगत त्यांनी लोकसभेत काय चालले आहे, याचे प्रसारण करण्याची सूचना लोकसभा वाहिनीला केली.
संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनीसुद्धा विरोधकांच्या गोंधळाबद्दल संताप व्यक्त केला. देशवासियांनी तुम्हाला नाकारले आहे. तरीही तुम्ही असा गोंधळ घालत आहात, असे सांगत त्यांनी कॉंग्रेसच्या सदस्यांना प्रत्युत्तर दिले. मंगळवारी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यापासून कॉंग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यातच सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज पूर्ण केले. त्यानंतर शून्य काळाचे कामकाजही विरोधकांच्या घोषणाबाजीतच सुरू ठेवण्यात आले.
महत्त्वाचे विषय मांडत असताना कॉंग्रेसचे काही सदस्य गोंधळ घालत असल्याबद्दल विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात फलक दाखवू नका, अशा सूचना वारंवार सुमित्रा महाजन यांच्याकडून करण्यात येत आहेत. मात्र, विरोधक ऐकण्याच्या मनःस्थिती नसल्याने त्यांनी आज सरळपणे सभागृहात जे काही चालले आहे, ते वाहिनीवर दाखविण्याची सूचना केली. सभागृहात काय चालले आहे, हे देशातील लोकांना कळू द्या, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा