नवी दिल्ली : अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. ‘सी-१७’ या अमेरिकन लष्कराच्या विमानातून टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून २०५ बेकायदा स्थलांतरितांना भारतात परत पाठविले जात असल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात अमेरिकेचा दौरा करणार असून ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेटही घेणार आहेत. असे असताना या चर्चेची वाट न पाहता अमेरिकेने कारवाई सुरू केली आहे.

अमेरिकेत १.१० कोटी बेकायदा स्थलांतरित आहेत असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. स्थलांतरितांविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केल्यानंतर भारतात पाठवण्यात येणारा हा स्थलांतरितांचा पहिला गट आहे. याविषयी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाशी संपर्क साधला असता, त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेकायदा स्थलांतरितांसाठी जोखीम पत्करण्याची गरज नाही. गेल्या वर्षी अमेरिकेतून जवळपास १,१०० बेकायदा स्थलांतरित विशेष विमानांनी भारतात परत पाठवण्यात आले होते. अमेरिकेच्या स्थलांतर विभागाचे अधिकारी जवळपास २० हजार बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्यास सज्ज आहेत. एका अंदाजानुसार, अमेरिकेत जवळपास सात लाख २५ हजार बेकायदा भारतीय स्थलांतरित आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी आपल्याला जे योग्य असेल ते करण्यास सांगितले आहे आणि ते बेकायदा स्थलांतरितांना परत घेण्यास तयार आहेत,’ असे ट्रम्प यांनी यापूर्वी जाहीर केले होते. तर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली होती. त्या वेळी आपण बेकायदा स्थलांतरितांची पडताळणी करून त्यांना परत घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. “बेकायदा स्थलांतर हे अनेकदा बेकायदा कृत्यांशी संबंधित असतात. ते आमच्या प्रतिमेसाठी इष्ट किंवा फायदेशीर नाही. आमचा कोणताही नागरिक अमेरिकेत बेकायदा राहत असल्याचे आढळले आणि आम्ही त्यांचे नागरिकत्व पडताळले तर आम्ही त्यांना कायदेशीरपणे भारतात परत पाठवण्याचे स्वागत करू,” असे जयशंकर यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते.

अमेरिका स्थलांतरितांविषयीच्या कायद्यातील त्रुटी दूर करत आहे आणि बेकायदा स्थलांतरितांना परत पाठवले जात आहे. या कृतीतून एक संदेश स्पष्टपणे दिला जात आहे की, बेकायदा स्थलांतरितांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही जोखीम घेण्याची गरज नाही. दिल्लीतील अमेरिकी दूतावास

Story img Loader