विजय मल्ल्या यांच्या अखत्यारीतील किंगफिशर विमान कंपनीची थकबाकी वसूल करण्याकामी काही कायदेशीर आव्हाने असली तरी या थकबाकीची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. किंगफिशर एअरलाइन्सकडे स्टेट बँकेसह अन्य बँकांचे सुमारे ७,५०० हजार कोटी रुपये थकीत आहेत.त्यांपैकी स्टेट बँकेची थकबाकी १,६०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
किंगफिशरचे खाते सध्या कार्यरत नाही आणि आम्ही कोणाच्या खासगी खात्याबद्दल बोलू इच्छित नाही, असे स्पष्ट करून त्यांची थकबाकी वसूल करण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यात येत असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. किंगफिशर एअरलाइन्सच्या समभागांची विक्री केल्यानंतर बँकेची किती थकबाकी वसूल झाली, असे विचारले असता फारशी नाही, केवळ ३५० ते ३०० कोटी रुपये वसूल झाल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. स्टेट बँकेखेरीज किंगफिशरकडे अन्य बँकांची असलेली थकबाकी पुढीलप्रमाणे आहे. युनायटेड बँक ऑफ इंडिया (४३० कोटी रु.), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (४१० कोटी रु.), युनायडेट कमर्शियल बँक (३२० कोटी रु.), कॉर्पोरेशन बँक (३१० कोटी रु.), स्टेट बँक ऑफ म्हैसूर (१५० कोटी रु.), इंडियन ओव्हर्सीज बँक (१४० कोटी रु.), फेडरल बँक (९० कोटी रु.), पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक (६० कोटी रु.), अ‍ॅक्सिस बँक (५० कोटी रु.).
याखेरीज, श्री इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स (४३० कोटी रु.), जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर बँक (८० कोटी रु.), ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्स ५० कोटी रु.) या बँकांनाही किंगफिशर एअरलाइन्स देणे आहे.