अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. तसेच हिंदू संघटनाकडून अनेक ठिकाणी अक्षता वाटप केल्या जात आहेत. मध्य प्रदेशच्या शाजापूर येथे हिंदू संघटनांनी काढलेल्या अक्षता वाटप मिरवणुकीवर दगडफेक करण्याची घटना घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला, तर पोलिसांनी कारवाई करताना आठ लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच २४ ज्ञात आणि १५ ते २० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकार सोमवारी घडला. हिंदू संघटनेच्या वतीने अक्षता वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला होता. सायंकाळी ७.३० मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर ८.३० वाजता सात ते आठ लोकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या परिसरात मिरवणूक काढू नका, असे या लोकांकडून सांगण्यात आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर मिरवणुकीवर दगडफेक झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शाजापूरचे पोलिस अधिक्षक यशपाल राजपूत यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणात आतापर्यंत आठ लोकांना ताब्यात घेतले असून आणखी आरोपींचा तपास सुरू आहे. शहरातील तणाव आता निवळला असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी गस्त घालणारे पथक तैनात केले आहे. तसेच शाजापूर शहरात कलम १४४ लावून प्रतिबंधक उपाय राबविले आहेत.
घटनेची माहिती मिळताच देवास लोकसभेचे भाजपा खासदार महेंद्र सोलंकी यांनी मंगळवारी शाजापूरला भेट दिली. यावेळी पोलिस प्रशासनाशी केलेल्या दीर्घ चर्चेनंतर त्यांनी कारवाईवर समाधान व्यक्त केले. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की, पोलिस योग्य ती कारवाई करत आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आरोपींची घरे जमीनदोस्त करण्याचाही पर्याय स्वीकारला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.
सोलंकी पुढे म्हणाले, मिरवणुकीवर झालेला हल्ला नियोजित होता. दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. आठ जणांना सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. जर गरज भासल्यास आरोपींच्या घरावर हातोडा पडू शकतो.
दुसरीकडे काँग्रेसने मात्र या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेमागे भाजपाचाच हात आहे, असा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा म्हणाले की, या घटनेची निष्पक्ष चौकशी करून, जो कुणी यामागे आहे, त्याला समोर आणले पाहीजे. मात्र लोकसभा निवडणुकीआधी, अशा घटना का घडत आहेत? हे कुणी घडविले? याचाही तपास झाला पाहीजे. आम्हाला शंका आहे की, संघ परिवार आणि भाजपा यांचा या घटनेमागे हात असावा.