करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी दोन नवीन प्रभावशाली औषधांची निर्मिती केली असून ज्या लोकांना ही औषधे देण्यात आली, त्यांचा करोनापासून पूर्णपणे बचाव झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेप्टाइडवर आधारित ही औषधे असून ती क्यूआयएमआर बेर्गहॉफर मेडिकल रीसर्च इन्स्टिट्यूट या ऑस्ट्रेलियातील संस्थेने तयार केली आहेत. फ्रान्सच्या आयडीएमआयटी या संस्थेत या औषधाच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शोधनिबंध नेचर सेल डिस्कव्हरी या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

प्रयोगशाळेतील चाचण्यात असे दिसून आले, की पहिल्या पेप्टाइड आधारित औषधाने एसीइ २ प्रथिनाला रोखून मानवी शरीरात संसर्ग कमी केला जातो. एसीइ २ या प्रथिनाच्या मदतीनेच विषाणू पेशीला चिकटून संसर्ग करतो. हा विषाणू नंतर संरक्षित पेप्टाइडला पेशी समजून हल्ला करतो व त्याची फसगत होते. पेप्टाइड आधारित दुसऱ्या औषधात विषाणू यजमान पेशींमध्ये विषाणूंची संख्या वाढवू शकत नाही. त्यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते. वरिष्ठ संशोधक व प्राध्यापक सुधा राव यांनी सांगितले, की एसीइ २ प्रथिनासाठी रासायनिक खुणेचे काम करणारी काही रसायने असतात, त्यांचा अभ्यास करून ही औषधे तयार केली आहेत. त्यामुळे विषाणू पेशीत प्रवेश करू शकत नाही. दोन्ही पातळ्यांवर काम करणारी ही औषधे आहेत. चाचण्या पूर्ण यशस्वी झाल्यानंतर त्यांचा उपचारपद्धतीत समावेश करता येऊ शकेल.

औषधाची वैशिष्ठ्ये

या औषधाचे कुठले दुष्परिणाम नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कक्ष तपमानाला स्थिर राहू शकत असल्यामुळे ती साठवण्यासाठी वेगळी व्यवस्था लागत नाही. ती वितरणासही सोपी आहेत.

या औषधांमध्ये सार्स करोना २ विषाणूला लक्ष्य करण्याऐवजी ज्या पेशी त्या विषाणूला प्रतिसाद देतात त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

पेप्टाइड वर आधारित हे पहिले औषध असून ते संसर्गाच्या आधीच दिले तर विषाणूपासून बचाव होतो तसेच हे औषध घेतले असेल, तर नंतर घेतलेल्या लशींची परिणामकारकताही वाढते.

दुसरे एक औषध तयार करण्यात आले असून त्याच्या मदतीने विषाणूचा संसर्गित पेशीतील फैलाव रोखला जातो.

सार्स सीओव्ही २ विषाणू पेशीत कशा पद्धतीने प्रवेश करतो याचा अभ्यास करून पेप्टाइड आधारित हे औषध तयार केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Production of two new drugs to prevent corona infection akp