देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्याचा भाजपा सरकारवर आरोप करणाऱ्या एका प्राध्यापकाला आपला माफीनामा सादर करावा लागला आहे. कदाचित मंगळवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही होऊ शकते. भाजपा आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या प्राध्यापकाला माफीनामा द्यायला भाग पाडले आहे.
बंगळूरू येथील डॉ. पी. जी. हलकट्टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या संदीप वाठार यांनी हा माफीनामा सादर केला आहे. वाठार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन मोदी सरकारवर टीका करताना त्यांनी देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप केला होता. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन्ही देशांतील तणावर दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले होते. त्यांच्या या लिखाणावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर वाठार यांनी आपली पोस्ट डिलीट केली, तसेच जाहीर माफी मागितली.
कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते एम. बी. पाटील यांच्या बिजापूर लिंगायत विकास शिक्षण संस्थेमार्फत हे महाविद्यालय चालवले जाते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. पी. हुग्गी म्हणाले, वाठार यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात येईल. संबंधीत प्राध्यापकाने आपला मोबाईल फोन बंद ठेवला असून तो अनरिचेबल येत असल्याचे या प्राचाऱ्यांचे म्हणणे आहे.
फेसबुकवर प्रा. वाठार यांनी दोन वेगवेगळ्या पोस्ट लिहिल्या होत्या. यांपैकी एका पोस्टमध्ये वाठार यांनी म्हटले होते की, भाजपा आणि इतर उजव्या विचारसरणीच्या संघटना भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आपण खूपच हुशार असल्याचे सांगत आहेत. मात्र, तुम्हीच या तणावाचे खरे कारण आहात. अशा प्रकारे निर्णय घेत तुम्ही करोडे देशवासियांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहात. मात्र, भाजपाला याची जराही लाज वाटत नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रवक्ते विवेक रेड्डी म्हणाले, देशाची एकता भंग करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच शत्रू राष्ट्राचे कौतुकही केले जात आहे.