MP College Peon Checking Exam Papers: मध्य प्रदेशमधील एका महाविद्यालयातील शिपाई विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासत असल्याचा व्हिडीओ जानेवारी महिन्यात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता विद्यापीठाने मोठी कारवाई केली आहे. ज्या प्राध्यापिकेने शिपायाला पैसे देऊन उत्तर पत्रिका तपासून घेतल्या होत्या, त्या प्राध्यापिकेला आता बडतर्फ करण्यात आले आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे शिपायाला उत्तर पत्रिका तपासण्याचे काम दिले होते, असा खुलासा सदर प्राध्यापिकेने केला आहे.
जानेवारी २०२५ मध्ये एक शिपाई विद्यार्थ्यांचे पेपर तपासत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पन्नालाल पथारिया नामक शिपाई मध्य प्रदेशच्या पिपारिया शहरात असलेल्या शहीद भगत सिंग सरकारी पदव्यूत्तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पेपर तपासत होता. प्राध्यापक खुशबू पगारे यांच्याकडून हे काम मिळाले असल्याचे शिपायाने सांगितले.
सदर व्हिडीओ समोर आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी स्थानिक आमदार ठाकूर दास नागवंशी यांच्या सहकार्याने तक्रार दाखल केली. मात्र उच्च शिक्षण विभागाने सुरूवातीला याची दखल घेतली नाही. सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे अनेक लोक टीका करू लागल्यानंतर उच्च शिक्षण विभागाने चौकशीसाठी समिती स्थापन केली.
३ एप्रिल रोजी चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला. अहवालातील माहितीनुसार, खुशबू पगारे यांनी स्वतःचे काम न करता ते पन्नालाल पथारिया यांच्याकडून करून घेतले. यासाठी त्याला ५ हजार रुपये देण्यात येत होते. प्राध्यापिका पगारे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी विद्यापीठातील कर्मचारी राकेश मेहेर यांना पेपर तपासण्यासाठी माणूस शोधण्याचे काम दिले होते. यासाठी मेहेर यांना ७००० रुपये देण्यात आले होते.
चौकशी समितीच्या अहवालानंतर खुशबू पगारे आणि पन्नालाल पथारिया यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पथारिया यांनी लाच घेऊन काम केल्याबद्दल आणि पगारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
तसेच विद्यापीठाचे प्रभारी मुख्याध्यापक राकेश कुमार वर्मा आणि प्राध्यापक रामगुलाम पटेल यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रियेचे पालन न केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला गेला आहे. विभागीय चौकशी अहवालात असे म्हटले की, महाविद्यालयातील परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी वरीष्ठ थेट जबाबदार असतात. त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या परीक्षेत अनियमितता आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे.