प्रदीर्घ परंपरा असलेल्या भारतीय रागदारीचे मोल सतारीच्या झंकारांतून जगाला पहिल्यांदा पटवून देणारे सूरभास्कर, ‘बीटल्स’ या ब्रिटिश बँडने १९६० च्या दशकात सुरू केलेल्या संगीत चळवळीमधून त्रिखंड भारतीय सुरावटींनी नादावून टाकणारे अवलीया आणि संगीतामधील पौर्वात्य- पाश्चात्त्य ‘घराणी’ एकत्र करणारे सतार सम्राट पंडित रविशंकर यांचे बुधवारी अमेरिकेतील रुग्णालयात वद्धापकाळ तसेच आजारपणाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. भारतीय शास्त्रीय संगीताची पताका पाश्चिमात्य जगात त्यांनी डौलाने फडकविली. मदतनिधीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर १९७१ साली पहिल्यांदा बांगलादेशासाठी ‘कन्सर्ट’  करून त्यांनी या संकल्पनेचे जनकत्व प्रस्थापित केले. ‘जागतिक संगीतातील पितामह’ या नावाने पाश्चिमात्य जगतात गौरविल्या जाणाऱ्या पंडित रविशंकर यांच्या निधनाने आठ दशके सुरू असलेली ‘मैफल’ अखेर संपली आहे.
पंडितजींच्या संगीत कारर्किदीचा गौरव १९९९ मध्ये ‘भारतरत्न’ या भारतातील सर्वोच्च नागरी किताबाने करण्यात आला होता.  प्रतिष्ठेचा ‘ग्रॅमी’ पुरस्कार पंडितजींनी तीनदा पटकावला होता. पहिला ग्रॅमी पुरस्कार त्यांना १९६७ मध्ये त्यांच्या ‘वेस्ट मीटस ईस्ट’ या अल्बमसाठी मिळाला होता. ‘द लिव्हिंग रुम सेशन्स पार्ट-१’ या अल्बमसाठी २०१३ या वर्षांसाठीच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचविण्यात आले आहे.  पंडित रविशंकर यांच्या मागे त्यांची पत्नी सुकन्या, नोरा जोन्स तसेच अनुष्का शंकर या दोन मुली, तीन नातू, चार पणतू असा परिवार आहे. गेली काही वर्षे रविशंकर आजारपणामुळे त्रस्त होते. गेल्या गुरुवारी त्यांच्यावर कॅलिफोर्नियातील स्क्रीप्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पण, तिचा ताण ते सहन करू शकले नाहीत. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.     
चित्रकारकीर्द  : १९५५ चा सत्यजीत रे यांचा ‘पाथेर पांचाली’ हा त्यांच्या संगीताचा सुवर्णस्पर्श लाभलेला पहिला चित्रपट आहे. १९५७ सालचा तपन सिन्हा यांचा ‘काबुलीवाला’ आणि १९५९ सालचा सत्यजीत रे यांचा ‘अपूर संसार’ या दोन बंगाली चित्रपटांचे संगीतही त्यांनीच केले. १९६१ मध्ये ‘अनुराधा’ या हिंदी चित्रपटातील ‘हाय रे वो दिन क्यूं ना आए’, ‘सावरे सावरे, कैसे दिन बीते कैसी बीती रतियाँ’, ‘जाने कैसे सपनों में खो गयी अखिया’ँ ही लता मंगेशकर यांनी गायलेली त्यांची सर्वच गाणी आजही रसिकप्रिय आहेत. १९६३ साली आलेल्या ‘गोदान’चे संगीतही त्यांचेच होते.

Story img Loader