काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारच्या अनास्थेबद्दल भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून परदेशात लपवलेला काळा पैसा देशात परत आणण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्राने ते आश्वासन पाळलेले नसून याप्रकरणी आता राष्ट्रपतींनी लक्ष घालावे, अशी विनंतीही अडवाणी यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली.
काळ्या पैशाबाबत आश्वासन देऊनही केंद्र सरकारने कोणतेही पाऊल उचललेले नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग झाल्याचे अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्रिमंडळात असताना त्यांनी श्वेतपत्रिकेत ही घोषणा केली होती. त्यामुळे आता सरकारमध्ये नसले तरी ते सर्वोच्च पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी लक्ष घालून केंद्र सरकार आपले आश्वासन पाळेल, याकडे लक्ष द्यावे, असे अडवाणी यांनी म्हटले आहे.  
अडवाणी यांनी म्हटले की, अमेरिका, जर्मनीसारख्या बलशाली राष्ट्रांनीच नव्हे तर नायजेरिया, पेरू, फिलिपाईन्ससारख्या लहान देशांनीही लपवून ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत ठोस भूमिका घेत देशात आणला. मात्र आपल्या देशात वेगळेच असून स्विस बॅंकेत खाती असणाऱ्यांची नावे समोर आली असली तरी  बेकायदेशीररीत्या जमवलेला या काळ्या पैशातील एक पैसाही परत देशात आलेला नाही, असे अडवाणी यांनी नमूद केले.