पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि या मोहिमेला अधिकाधिक चालना देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ही मोहीम व्यापक करण्यासाठी त्यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि अन्य संघटनांना सहभागी करून घेण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी यांनी शनिवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्यानंतर देशात गेल्या सहा दिवसांमध्ये ३.७७ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. देशातील १२८ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे (४५ वर्षांवरील) लसीकरण करण्यात आले असून १६ जिल्ह्यांमध्ये याच वयोगटातील ९० टक्क््यांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे  नमूद करण्यात आले.

गेल्या सहा दिवसांत ३.७७ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती या वेळी मोदी यांना देण्यात आली. हे प्रमाण मलेशिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा यासारख्या देशांच्या एकूण लोकसंख्येहून अधिक आहे, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

करोनाचा फैलाव नियंत्रणात ठेवण्यासाठी चाचण्या हे महत्त्वाचे शस्त्र आहे त्यामुळे चाचण्यांचा वेग कमी होऊ नये यासाठी राज्यांसमवेत काम करावे, असा आदेश मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिला.

देशातील लसीकरणातील प्रगतीचे अधिकाऱ्यांनी मोदी यांच्यासमोर सविस्तर सादरीकरण केले आणि वयोगटानुसार करण्यात आलेल्या लसीकरणाचीही माहिती त्यांना देण्यात आली.

दिवसात ५८.१० लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

देशात शनिवारी ५८.१० लाख जणांचे लसीकरण करण्यात आले, त्यामुळे देशातील एकूण लसीकरणाने ३२ कोटींचा टप्पा पार केला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. देशात शनिवारी १८-४४ वयोगटातील ३६ लाख ६८ हजार १८९ जणांना लसीची पहिली मात्रा तर एक लाख १४ हजार ५०६ जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. आतापर्यंत देशात एकूण आठ कोटी ३० लाख २३ हजार ६९३ जणांना लसीची पहिली मात्रा, तर १८ लाख ४८ हजार ७५४ जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार ५८ लाख १० हजार ३७८ जणांना लशीच्या मात्रा देण्यात आल्या.

देशात दिवसभरात  ४८,६९८ रुग्ण

देशात गेल्या चोवीस तासांत करोना रुग्णांची संख्या ४८,६९८ ने वाढली असून    एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी १ लाख ८३ हजार १४३ झाली आहे.  मृतांची एकूण संख्या ३ लाख ९४ हजार ४९३ झाली आहे.  दिवसभरात ११८३  बळी गेले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ९५ हजार ५६५  झाली .

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promote vaccination with the participation of ngos prime minister narendra modi akp