पीटीआय, लंडन
मालदीवमध्ये गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान ‘प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव’ (पीपीएम) आणि ‘पीपल्स नॅशनल काँग्रेस’ (पीएनसी) यांच्या आघाडीने भारतविरोधी भावनांचे वातावरण तयार केले, तसेच भारत-मालदीव संबंधांच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवली असा निष्कर्ष युरोपीय महासंघाच्या निरीक्षकांनी काढला आहे.
मालदीवला गेलेल्या ‘युरोपियन इलेक्शन ऑब्झव्र्हेशन मिशन’ (ईयू ईओएम) या संस्थेने मंगळवारी आपला अंतिम अहवाल जाहीर केला. मालदीवमध्ये ९ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर २०२३ या दोन दिवशी निवडणुकीच्या दोन फेऱ्या पार पडल्या होत्या. मालदीवच्या राष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या आमंत्रणावरून गेलेल्या ‘ईयू ईओएम’च्या निरीक्षकांनी ११ आठवडे निरीक्षण केले होते.
हेही वाचा >>>नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल, काही पदावर होणार आता अशी निवड
‘पीपीएम-पीएनसी’’ आघाडीने निवडणुकीदरम्यान केलेला प्रचार हा त्या देशावरील भारताच्या प्रभावाच्या भीतीच्या आधारित होता असे या संस्थेला आढळले. विरोधातील ‘पीपीएम-पीएनसी’ने तत्कालीन अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोली यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता, त्यांच्या प्रचारामध्ये भारतविरोधी भावना, तसेच भारतीय लष्कराच्या उपस्थितीबद्दल भीती यांचा अंतर्भाव होता. त्याचबरोबर ऑनलाइन व्यासपीठांचा वापर करून मोठय़ा प्रमाणात खोटी माहिती पसरवण्यात आली असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.चीनशी जवळीक असणाऱ्या मोहम्मद मुईझ्झू यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतविरोधी वातावरण तापवल्याचे निरीक्षण आहे.