प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने कठोर शब्दांमध्ये फटकारलं आहे. नुपूर शर्मा यांनी आपल्याविरोधात दाखल सर्व गुन्हे दिल्लीमध्ये हस्तांतरित केले जावेत अशी मागणी करणारी याचिका केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना देशात सध्या जे काही सुरु आहे ते तुमच्यामुळेच असं सुनावलं आहे.
कोर्टाने फटकारताना केलेली पाच महत्वाची विधानं –
१) नुपूर शर्मा यांच्या वकिलाने त्यांना धमक्या मिळत असून प्रवास करणं सुरक्षेचं नाही असा युक्तिवाद केला असता न्यायमूर्ती सूर्यकांत दास म्हणाले की, “त्यांना धमक्या मिळत आहेत की त्याच धोका ठरत आहेत? देशात जे काही सुरु आहे त्यासाठी ही महिला एकटी जबाबदार आहे”.
२) “त्यांना कशाप्रकारे भडकावण्यात आलं होतं ती चर्चा आम्ही पाहिली. पण ज्याप्रकारे त्यांनी विधान केलं आणि नंतर वकील असल्याचं सांगितलं हे लज्जास्पद आहे. त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी,” असं न्यायाधीशांनी सांगितलं.
“देशात जे सुरू त्याला केवळ ही महिला जबाबदार”; सर्वोच्च न्यायालयाचे नुपूर शर्मावर ताशेरे
३) सुप्रीम कोर्टाने यावेळी दिल्ली पोलीस आणि चर्चेचं आयोजन करणाऱ्या वृत्तवाहिनीवरही ताशेरे ओढत म्हटलं की, “दिल्ली पोलिसांनी काय केलं? आम्हाला तोंड उघडायला लावू नका. टीव्हीवरील चर्चा नेमकी काय होती? फक्त एका अजेंड्यासाठी होती का? त्यांनी हा विषय का निवडला?”.
४) सुप्रीम कोर्टाने यावेळी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटलं की, “जेव्हा तुम्ही इतरांविरोधात गुन्हा दाखल करता, तेव्हा लगेच अटक केली जाते. पण इथे तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणी हात लावण्याची हिंमतही केली नाही”.
५) नुपूर शर्मा यांना फटकारताना सुप्रीम कोर्टाने यावेळी त्यांचा हट्टी आणि गर्विष्ठ स्वभाव यातून दिसत असल्याचं म्हटलं. “त्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत म्हणून काय झालं. आपल्यामागे सत्ता आहे आणि कायद्याची हमी न बाळगता आपण काहाही वक्तव्य करु शकतो असं त्यांना वाटत आहे,” अशा शब्दात न्यायमूर्ती सूर्यकांत दास यांनी सुनावलं आहे.
६) “नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उदयपूरमध्ये एका शिवणकाम व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागला आहे,” असं कोर्टाने निदर्शनास आणून दिलं.
काय आहे प्रकरण?
एका टिव्ही कार्यक्रमात चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी प्रेषित महोम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. देशात ठिकठिकाणी नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली. तसंच मुस्लिमांनी शर्मा यांच्या अटकेची मागणी केली होती. भारतासोबत अखाती देशातही या विधानाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना प्रवक्ता पदावरुन निलंबित केलं.
नूपुर शर्माचे समर्थन करणाऱ्याची हत्या; उदयपूरमधील घटनेनंतर तणाव
नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले आणि या हल्ल्याची चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली. या घटनेमुळे सध्या तणाव आहे.
कन्हैयालाल तेली असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचे दुकान आहे. २६ जूनला दुपारी दुचाकीवरून दोघे जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैयालालवर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका हल्लेखोराचे नाव रियाज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने वार केले आणि दुसऱ्या तरुणाने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण केले, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.