भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाराजीचा सामना करावा लागत आहे. देशात कानपूर तसंच अन्यत्रही हिंसक घटना झाल्या. शिवाय, आखाती देशांनीही नूपुर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत मोदी सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊ हे विष पसरण्यापासून थांबवलं पाहिजे असं मत मांडलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकरणावर आपली स्पष्ट मतं मांडली.
“या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसंच धर्मसंसदेत (हरिद्वार) जे बोललं गेलं त्यावर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी तसं सांगावं आणि नसेल तर तसंही स्पष्ट करावं,” असं आवाहन नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.
भाजपाच्या फायरब्रँड नेत्या नुपूर शर्मांवर कारवाई कशासाठी?; पक्षाचं नेमकं म्हणणं काय?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकांना ट्वीटरला फॉलो करत आहेत. त्यांनी काही तरी केलं पाहिजे, त्यांनी हे विष अजून पसरण्यापासून रोखलं पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
नुपूर शर्मा यांनी टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाला असून १५ देशांनी निषेध नोंदवला आहे. यामध्ये इराण, इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, युएई, इराण, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहारिन, मालदिव, लिबया आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे.
विश्लेषण: नुपूर शर्मांवर २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेलं कलम नेमकं काय आहे?
भाजपाने नुपूर शर्मा यांच्यासोबत नवीन जिंदाल यांच्यावरही कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. नुपूर शर्मा यांनी महादेवाचा वारंवार अपमान होत असल्याने आपण दिलेली ती प्रतिक्रिया होती असा दावा केला होता. त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.
भाजपाने नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करताना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. पण नसीरुद्दीन शाह यांनी त्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत याची आठवण करुन दिली. नुपूर शर्मांनी हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या विधानावर बोलताना नसीरुद्दीन शाह यांनी अशी एकही घटना आपल्याला आठवच नसल्याचं सांगितलं. “मुस्लीम व्यक्तीने हिंदू देवतांविरोधात अशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान केल्याची एकही घटना मला आठवत नाही,” असं ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “भावना दुखावल्याबद्दल मागितलेली ही माफी मनापासून नव्हती. तुम्ही शांतता आणि एकतेबद्दल बोलता आणि एक वर्षासाठी जेलमध्ये पाठवलं जातं. तुम्ही नरसंहारावर बोलता तेव्हा शिक्षा दिली जाते. दुटप्पी भूमिका बजावत काम केलं जात आहे”.
नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असतील तर त्याचा निषेध केला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. “तशा पद्धतीने विचार कऱणंही चुकीचं आहे. म्हणूनच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सध्या त्या स्थितीत आहेत. त्या देशांचं अनुकरण आपल्याला करायचं नाही आहे, पण आपण ते थोड्या फार पद्धतीने करत आहोत. गाईंची हत्या केल्याच्या संशयात लोकांना मारलं जात आहे. अशा घटना इस्लामिक देशांमध्ये घडतात, भारतात नाही,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.
नसीरुद्दीन शाह यांनी यावेळी द्वेषयुक्त चर्चेसाठी वृत्तवाहिन्यांना जबाबदार धरलं. “द्वेष निर्माण केला जात असून जेव्हा तुम्हाला विरोधी दृष्टिकोनाचा सामना करावा लागतो तेव्हा ते विष असतं. टीव्ही न्यूज आणि सोशल मीडिया यासाठी जबाबदार आहे,” असं ते म्हणाले. अनेक वर्षांपासून हा द्वेष तयार होत असल्याचंही ते म्हणाले.
बॉलिवूमधील खानमंडळींनी या वादावर बोललं पाहिजे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते ज्या स्थितीत आहे तिथे सध्या मी नाही. पण मला वाटतं ते अशा स्थितीत आहे जिथे त्यांच्याकडे गमावण्यासारखं फार आहे. त्यांना यामध्ये फार जोखीम पत्करावी लागू शकते”.
नसीरुद्दीन शाह आर्यन खानला झालेली अटक आणि नंतर त्याची केलेली निर्दोष मुक्तता यावरही भाष्य केलं. “शाहरुख खानसोबत जे झालं आणि ज्या पद्दतीने तो सामोरं गेला ते वाखाणण्याजोगं होतं. त्याने फक्त तृणमूल काँग्रेसला पाठिंबा आणि ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं. सोनू सूदवर धाड टाकण्यात आली. जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला उत्तर दिलं जात आहे. कदाचित यानंतर माझा क्रमांक असेल. पण त्यांना काही मिळणार नाही,” असं त्यांनी मिश्कीलपणे सांगितलं.