घटनेच्या ३७० व्या कलमाचा जम्मू-काश्मीरला कोणता फायदा झाला, याचे उत्तर संबंधित समर्थकांनी देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे केले. घटनात्मक तरतुदीद्वारे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणाऱ्या या कलमावर चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
३७० वे कलम रद्द करण्याच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी या मुद्दय़ांचा विचार केला पाहिजे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरला कोणताही फायदा झालेला नाही, असा दावा करून या कलमामुळे राज्यातील गरिबी दूर झाली काय, अशी विचारणा राजनाथ सिंह यांनी केली. राज्यातील गरिबी दूर झाली असती तर आम्ही निश्चितपणे स्वागत केले असते, परंतु तसे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरसाठी ३७० वे कलम बहाल करणाऱ्या या तरतुदीवर चर्चा झाली पाहिजे. ३७० व्या कलमावर भाजपची भूमिका स्पष्ट असून त्यावर आम्ही सर्व संबंधितांसमवेत चर्चा करू आणि हे कलम रद्द करण्यासाठी पावले उचलू, असे राजनाथ सिंह म्हणाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तारूढ झाली तर पाकिस्तानसमवेतच्या संबंधांबद्दल काय, असे विचारले असता आम्हाला त्यांच्यासमवेत चांगले संबंध हवे आहेत, परंतु त्यांनीही तसाच प्रतिसाद द्यायला हवा, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकिस्तानसमवेत सगळ्याच शेजारी राष्ट्रांशी आम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader