Tipu Sultan Row : कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षात असलेली भाजपा टीपू सुलतानच्या मुद्द्यावरुन समोरासमोर आले आहेत. काँग्रेसच्या एका आमदाराने कर्नाटकातील विमानतळांची नावं बदलण्याचा प्रस्ताव दिला. जो सर्वसंमतीने मान्य झाला. या प्रस्तावामुळेच काँग्रेस आणि भाजपा यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. कारण मैसूर विमानतळाला टीपू सुलतान विमानतळ असं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्यानंतर वाद सुरु झाला आहे.
काय घडलं?
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हुबळी विमानतळाचं नाव क्रांतिवरी संगोली रायन्ना, बेळगाव विमानतळाचं नाव कित्तूर राणी चेन्नमा, शिवमोगा विमानतळाचं नाव डॉ. के. व्ही पुट्टप्पा विमानतळ, अशी नावं देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्यानंतर हुबळीचे काँग्रेस आमदार प्रसाद अब्बय्या यांनी मैसूर विमानतळाचं नाव टीपू सुलतान विमानतळ ठेवलं जावं असा प्रस्ताव मांडतो असं म्हटलं आहे. ज्यानंतर भाजपाने काँग्रेसचा निषेध नोंदवत निदर्शनं केली.
२०१६ पासून टीपू सुलतानच्या नावावरुन वाद
कर्नाटकात टीपू सुलतानच्या नावाचा वाद आत्ताचा नाही. हा वाद आता या नव्या मागणीमुळे पुन्हा सुरु झाला आहे. माक्ष १० नोव्हेंबर २०१६ या दिवशी हा वाद सुरु झाला होता. कारण त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसने टीपू सुलतानची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. कर्नाटक भाजपा आणि महाराष्ट्रातून या नावाला विरोध झाला. मतांच्या लांगुलचालनासाठी काँग्रेसने ही खेळी खेळल्याचा दावा त्यावेळी भाजपाने केला होता. यानंतर याच वर्षी जून महिन्यात टीपू सुलतान आणि औरंगजेब यांच्यावरुन व्हायरल झालेल्या पोस्टचा उल्लेख करत निदर्शने केली होती.
कर्नाटकची विधानसभा निवडणूक याच वर्षी पार पडली. या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. मात्र निवडणूक प्रचाराच्या वेळी राज्य भाजपाचे प्रमुख नलिन कातील यांनी हा मुद्दा पुढे केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही टीपू सुलतानची वाहवा गाणारे लोक तु्म्हाला हवे आहेत का असा प्रश्न कर्नाटकच्या जनतेला भाषणांतून विचारला होता.
टीपू सुलतानची हत्या कुणी केली यावरुनही वाद सुरु झाला होता. काही इतिहासकारांचं हे म्हणणं आहे की टीपू सुलतानचा मृत्यू १७९९ च्या मैसूर युद्धात झाला होता. तर यावर्षी निवडणुकीच्या आधी काही विशिष्ट घटकांनी हा दावा केला होता की वोक्कालिगा समुदायाच्या दोन सरदारांनी टीपू सुलतानची हत्या केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जेव्हा प्रचाराला आले होते तेव्हा त्यांनी टीपू सुलतानच्या विरोधात जय बजरंगबली चा नारा देऊन काँग्रेसवर तिखट शब्दांत टीका केली होती.