पाकिस्तानमध्ये हिंदूधर्मीयांच्या सक्तीने सुरू असलेल्या धर्मांतराबद्दल ‘डॉन’ या प्रसिद्ध वृत्तपत्राकडून आवाज उठवण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तानी सरकारकडे या हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली असून या सगळ्याबद्दलचा सविस्तर अहवाल सरकारपुढे मांडला आहे. पाकिस्तानच्या थार येथील वाळवंटात हिंदू आणि मुस्लिम अशी मिश्र लोकसंख्या आहे. मात्र, या दोन्ही धर्माचे लोक याठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उर्वरित पाकिस्तानी समाज आणि जगासाठी हा मोठा आदर्श असल्याचे डॉनने म्हटले आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील सामाजिक संस्कृती झपाट्याने बदल चालल्याचे दिसत आहे. हे वातावरण या परिसराला आपला पारंपरिक निवास मानणाऱ्यांच्यादृष्टीने घातक ठरू शकते. काही धर्मगुरू आणि सरंजामी प्रवृत्तीच्या व्यक्ती गरिबी आणि जातीय भेदभावाचा दुरूपयोग करून येथील हिंदूंवर दबाव निर्माण करत आहेत.

सर्वसामान्य हिंदू आणि मंदिरांना लक्ष्य करू नका: अल कायदा

याशिवाय,या परिसरातील मदरशांच्या वाढत्या प्रभावामुळे याठिकाणी कट्टरतावादाची लाट पसरत चालली आहे. साम-दाम-दंड-भेद या जमेल त्या मार्गाने हिंदूचे धर्मांतर करणे, हा काही लोकांचा प्रमुख अजेंडा बनला आहे. यासाठी अल्पवयीन हिंदू मुली आणि तरूणींवरील अपहरण आणि बलात्कारासारख्या कृत्यांचेही समर्थन केले जात आहे. त्यानंतर हिंदू समाज आपल्याला पुन्हा स्वीकारणार नाही, या अपरिहार्यतेपोटी या मुली मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार होतात. तसेच मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर आपल्या कुटुंबियांशी पुन्हा संपर्क साधायचा नाही, अशी अटही या मुलींना घातली जाते. याशिवाय, काही हिंदूधर्मीयांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आमिषं आणि प्रलोभनेही दाखवली जातात. या पार्श्वभूमीवर या हिंदू धर्मीयांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे डॉन वृत्तपत्रात म्हटले आहे.

सक्तीच्या धर्मांतरामुळे पाकमध्ये हिंदूंची संख्या फक्त ६ टक्क्यांवर