एका धर्मनिरपेक्ष प्रकाशकाची हत्या आणि दोन ब्लॉगर्ससह एक प्रकाशक हल्ल्यात जखमी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशातील संतप्त निदर्शक रविवारी रस्त्यांवर उतरले. भारतीय उपखंडातील अल-कायदा संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
गेल्या अडीच वर्षांत बांगलादेशातील ६ लेखक व ब्लॉगर्सची हत्या करण्यात आली आहे. यापैकी पाच जण या वर्षी जानेवारीनंतर मारले गेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप मृतांचे कुटुंबीय आणि मित्रांनी केला आहे.
यापूर्वी हत्या झालेला नास्तिक लेखक व ब्लॉगर अविजित रॉय याच्यासोबत काम करणारा फैजल दीपान याचा शनिवारी मध्य ढाक्यातील त्याच्या कार्यालयात खून करण्यात आला होता. त्याच्या काही तास आधीच अज्ञात हल्लेखोरांनी दोन धर्मनिरपेक्ष लेखकांसह रॉय याची पुस्तके प्रकाशित करणारा अमेरिकी नागरिक रशीद तुतुल यांच्यावर केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला होता. अल-कायदाची भारतीय उपखंडातील शाखा अन्सर अल-इस्लाम बांगलादेश या संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांच्या निषेधार्थ उजवे गट आणि सामाजिक संघटना यांनी रविवारी राजधानी ढाक्याच्या रस्त्यांवर मोर्चे काढले.

Story img Loader