पीटीआय, इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाने सरसकट संरक्षण दिल्याचा आरोप करत सत्ताधारी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटच्या (पीडीएम) घटक पक्षांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यामध्ये पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज गटाच्या (पीएमएल-एन) मरायम नवाज शरीफ आणि जमैत-उलेमा-इ-इस्लाम-फज्लचे (जेयूएल-एफ) प्रमुख मौलाना फझलूर रहमान यांनी सहभाग घेतला.
मौलाना फझलूर रहमान हे १३ पक्षांचा समावेश असलेल्या पीडीएमचे प्रमुख आहेत. पीएमएल-एन आणि जेयूएल-एफ यांच्याबरोबर पाकिस्तान पीपल्स पार्टीनेही (पीपीपी) यामध्ये सहभाग घेतला. परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी हेदेखील यामध्ये आंदोलनात सहभागी होणार होते, मात्र नंतर वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यावरून त्यांनी हा निर्णय मागे घेतला. यावेळी निदर्शकांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमर अता बांदियाल यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विशेष म्हणजे इस्लामाबादमध्ये संचारबंदी लागू असतानाही ही निदर्शने करण्यात आली. यावेळी काही निदर्शकांनी प्रतिबंधित भागांमध्ये प्रवेश केला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली अशी माहिती प्रशासनाने दिली.
झाले काय?
सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांना भ्रष्टाचार प्रकरणात जामीन दिला असून कोणत्याही यंत्रणेला त्यांना अटक करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्याच्या निषेधार्थ सत्ताधारी आघाडीचे घटक पक्षच रस्त्यावर उतरल्याचे दिसले. प्रतीकात्मक निषेध केल्यानंतर निदर्शक परत जाणार होते, पण पीडीएमचा सर्वात मोठा घटक असलेल्या जेयूएल-एफने निदर्शनांचे रूपांतर धरणे आंदोलनात केले.