काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली. यानंतर महाराष्ट्रात इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यावरून वाद निर्माण झाला. वंचित बहुजन आघाडीने अनेकदा इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करूनही काँग्रेस किंवा इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सहभागासाठी आमंत्रण आलं नाही, असा आरोप वंचितने केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आणि वंचितमध्ये सातत्याने शाब्दिक वाद सुरू आहे. अशातच आता शनिवारी (७ ऑक्टोबर) दिल्लीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट इंडियात समाविष्ट करावं या मागणीसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नवी दिल्ली येथील बंगल्यासमोर आंदोलन झालेलं पाहायला मिळालं. शाहिद खान इस्माईल खान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील मुस्लीम बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाचे नेते शाहिद खान इस्माईल खान म्हणाले, “आम्ही सर्व लोक महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलो आहोत. आमच्या सर्वांचा येथे येण्याचा हेतू फॅसिस्ट व जातीयवादी शक्तींना हरवणे आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षाला जिंकवणे हा आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी हा निवडणुकीतील खूप मोठा घटक आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितला एकूण ७ टक्के म्हणजे ५० लाख मतं मिळाली होती. सर्व जाती धर्मातील गरीब, वंचित आणि अल्पसंख्याक लोक मोठ्या संख्येने वंचितला पाठिंबा देतात.”
“वंचित आणि यूपीएच्या एकमेकांमधील भांडणात एनडीएला फायदा”
“इंडिया आघाडीला महाराष्ट्रात जिंकायचं असेल, तर वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेणं आवश्यक आहे. मागील निवडणुकीत वंचित आणि यूपीएच्या एकमेकांमधील भांडणात एनडीएला फायदा झाला होता. हे सर्वांना माहिती आहे. असं असूनही महाराष्ट्रातील काही नेते व्यक्तिगत फायद्यासाठी वंचितला इंडिया आघाडीत सहभागी करण्यात अडथळा आणत आहेत,” असा आरोप आंदोलक खान यांनी केला.
“इंडिया आघाडीच भाजपाची बी टीम आहे”
“वंचितला इंडिया आघाडीत सहभागी करून न घेतल्याने महाराष्ट्रातील मुस्लीम, दलित, ओबीसी आणि सर्व वंचित समाजात संतापाची भावना दिसत आहे. तसेच इंडिया आघाडीच भाजपाची बी टीम आहे आणि त्यांनाच भाजपाचा पराभव आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा विजय नको आहे, अशी भावना जनतेची तयार होत आहे”, असा आरोप आंदोलकांनी केला.