दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी (१० जून) नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी हातात पोस्टर्स घेत नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम नागरिक मोठ्या प्रमाणात जामा मशिदीबाहेर जमा झाले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. काही वेळानंतर यातील काही आंदोलक निघून गेले, मात्र काही अद्यापही आंदोलन करत आहेत.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ३१ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात एआयएमआयचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी, वादग्रस्त साधू यती नरसिंहानंद यांचाही समावेश आहे.
हेही वाचा : ‘कुतुबमिनार नाही, तर विष्णू स्तंभ’, दिल्लीत हिंदुत्ववाद्यांकडून हनुमान चालिसा वाचत दावा, पोलिसांकडून धरपकड
भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणं आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणं याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सोशल मीडियावरील वक्तव्यांचा तपास केल्यानंतर दोन गुन्हा दाखल करण्यात आले.