अन्य विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचेही लाक्षणिक उपोषण
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट (एफटीआयआय) या पुण्यातील संस्थेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या शंभराव्या दिवशी (१९ सप्टेंबर) अनेक शहरात निषेध मोर्चे काढण्याचा इशारा विद्यार्थी आंदोलकांनी येथे दिला.
दिल्लीत निदर्शकांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या बाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले, त्यात पुण्यातील संस्थेचे काही विद्यार्थी सहभागी झाले. संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी आज दिल्लीत निषेध मोर्चा काढण्यात आला.
पुण्यातील एफटीआयआय, दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ या संस्थांच्या विद्यार्थ्यांनी शास्त्री भवन रस्त्यावर माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या इमारतीबाहेर ठिय्या आंदोलन केले. नंतर त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने बाहेर काढले. परवानगी न घेता त्यांनी निदर्शने केल्याचे सांगण्यात आले.
सरकारकडून प्रतिसाद नाही
या प्रकरणी १२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. एफटीआयआयची विद्यार्थिनी साक्षी गुलाटी हिने सांगितले की, आमचे विद्यार्थी उपोषण करीत आहेत, काहींना रूग्णालयात हलवावे लागले तरी सरकारकडून काही प्रतिसाद नाही. अरूण जेटली पंतप्रधान मोदी यांच्या झकरबर्ग यांच्याबरोबरच्या नियोजित भेटीवर ट्विट करू शकतात, पण आमच्याशी बोलायला ते तयार नाहीत. एका विद्यार्थ्यांने सांगितले की, सरकारने एफटीआयआयचे भगवेकरण केले आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. एफटीआयआयचे विद्यार्थी बुधवारी मुंबई येथे आंदोलन करणार असून १८ सप्टेंबरला पतियाळात आंदोलन केले जाणार आहे.
१९ सप्टेंबरला आंदोलनाचा १०० वा दिवस असून त्या वेळी दिल्लीत मंडी हाऊस ते जंतरमंतर असा मोर्चा काढला जाणार आहे. देशभरात इतरत्रही निषेध मोर्चे काढले जाणार आहेत. आंदोलनाचा आज ९६ वा दिवस होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा