बगदाद : स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे इस्लाम धर्मग्रंथ कुराणची प्रत जाळल्यामुळे इराक पेटले आहे. संतप्त जमावाने गुरुवारी पहाटे बगदादमधील स्वीडिश दूतावासावर हल्ला केला. तिथे निदर्शने करून आग लावण्यात आली. या आगीत दूतावासातील कोणताही कर्मचारी जखमी झाला नसून प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

इराक सरकारने सुरक्षा दलांना दूतावासाचे संरक्षण आणि आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. इराकमधील शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सद्र यांच्या समर्थकांनी स्टॉकहोममध्ये कुराणची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा केली होती. स्टॉकहोममध्ये गेल्या काही आठवडय़ांत दुसऱ्यांदा धर्मग्रंथाचे दहन करण्यात आल्याने त्याला जोरदार विरोध करण्यात आला आहे. सद्र यांच्या समर्थकांनी स्वीडिश दूतावासावर गुरुवारी सकाळी हल्ला केला आणि स्वीडनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक आंदोलक दूतावासाच्या आवारातील कुंपणावर चढले होते. त्यांनी दूतावासाच्या एका विभागाचा दरवाजा तोडला आणि आग लावली. इतरांना दूतावासाच्या बाहेर पहाटेची प्रार्थना केली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलन थोपावले.

स्वीडिश परराष्ट्र मंत्रालयाने आमच्या दूतावासातील कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिली. बगदादमधील स्वीडिश दूतावास काही काळ बंद ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

इराकच्या सरकारने सुरक्षा अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमके काय घडले?

स्वीडनच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी स्टॉकहोममधील इराकी दूतावासाबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला स्टॉकहोमच्या पोलिसांनी परवानगी दिल्याचा आरोप इराकने केला आहे. दूतावासाबाहेर दोन आंदोलन कुराण आणि इराकचा ध्वज जाळणार असल्याचा अर्ज या आंदोलकांनी दिला होता. या दोघांपैकी एकाने जून महिन्यात मशिदीबाहेर कुराणचे दहन केले होते. मात्र स्वीडिश आंदोलकांनी कुराणाचे दहन केले नसल्याचे सांगितले. 

स्वीडनच्या राजदूताची हकालपट्टी स्टॉकहोममध्ये कुराणची विटंबना केल्याने इराकने स्वीडनच्या राजदूताची हकालपट्टी केली. इराकचे पंतप्रधान शिया अल-सुदानी यांनी हे आदेश दिले. त्याशिवाय इराकच्या राजदूतांनाही स्वीडनमधून परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.