वृत्तसंस्था, कोलंबो : अर्थअराजक माजलेल्या श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे जोपर्यंत सरकारी कार्यालये सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसण्याचा निर्धार सरकारविरोधी चळवळीच्या नेत्यांनी रविवारी केला. तर दुसरीकडे शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या अध्यक्ष राजपक्षे यांनी, स्वयंपाकाच्या गॅसचे देशभर व्यवस्थित वितरण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना अज्ञातस्थळावरून दिले. 

अर्थजर्जर श्रीलंकेतील सरकारविरोधी आंदोलकांनी शनिवारी अध्यक्षीय प्रासादाचा ताबा घेतल्यापासून तेथेच ठाण मांडले आहे. प्रासादातील सर्वच खोल्यांमध्ये निदर्शकांचा वावर असल्याच्या चित्रफिती वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाल्या आहेत. निदर्शकांनी राजपक्षे यांच्या प्रासादातून कोटय़वधी रुपये जप्त केल्याचा दावा केला. आम्ही हाल सोसत असताना अध्यक्ष मात्र मौजमजा करीत होते, अशी प्रतिक्रिया सरकारविरोधी आंदोलनाच्या नेत्यांनी व्यक्त केली.

शुक्रवारपासून भूमिगत असलेले अध्यक्ष राजपक्षे यांनी रविवारी अज्ञातस्थळावरून सरकारी अधिकाऱ्यांना स्वयंपाकाच्या गॅसचे योग्य रीतीने वितरण करण्याचे आदेश दिले. श्रीलंकेला ३,७०० मेट्रिक टन स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध झाला असून त्याचे वितरण सर्वत्र व्यवस्थित करावे, असे त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारविरोधी असंतोषाचा उद्रेक झाला असताना संसदेचे सभापती महिंदूा यापा अबेयवर्धने यांनी शनिवारी अध्यक्ष राजपक्षे येत्या बुधवारी, १३ जुलै रोजी राजीनामा देतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आंदोलक अध्यक्षीय प्रासादाचा ताबा सोडतील, अशी अपेक्षा होती, परंतु अध्यक्ष राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या निवासस्थानी ठाण मांडून बसण्याचा निदर्शकांचा निर्धार आहे. आंदोलकांच्या मागणीला कलावंत, लेखक, क्रिकेटपटू यांचाही पाठिंबा मिळत आहे. आंदोलकांनी शनिवारी रात्री केंब्रिज प्लेस येथील विक्रमसिंघे यांच्या खासगी निवासस्थानाला आग लावून मालमत्तेचे मोठे नुकसान केले होते. त्यानंतर विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती; परंतु त्यांनीही रविवारी संध्याकाळपर्यंत राजीनामा दिला नव्हता. दरम्यान, पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानातील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी रविवारी तिघांना अटक केली. दरम्यान, निदर्शनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ११ पत्रकारांसह १०२ जण जखमी झाले आहेत.

लष्करप्रमुखांचे शांततेचे आवाहन 

देशावरील राजकीय संकट दूर झाले असून, शांतता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शैवेंद्र सिल्वा यांनी रविवारी केले. सध्याच्या प्रश्नांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याची संधी आता उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय निवासात पावणेदोन कोटी 

श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानी घुसलेल्या आंदोलकांना तेथे एक कोटी ७८ लाख रुपये सापडल्याचा दावा करण्यात आला. समाजमाध्यमांतून प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. आंदोलकांनी ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली.

भारताचा पाठिंबा

भारताने श्रीलंकेतील सरकारविरोधी आंदोलनाला रविवारी पाठिंबा दिला. लोकशाही मार्ग, मूल्ये आणि घटनात्मक पद्धतीने देशाची समृद्धी आणि प्रगतीची आकांक्षा बाळगणाऱ्या श्रीलंकेतील नागरिकांच्या पाठिशी भारत आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अिरदम बागची यांनी स्पष्ट केले. भारत श्रीलंकेचा सर्वांत जवळचा शेजारी आहे. दोन्ही देशांदरम्यान दृढ सांस्कृतिक संबंध आहेत. भारताने श्रीलंकेला आतापर्यंत ३.८ अब्ज डॉलर्सची मदत केली आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

सर्वपक्षीय सत्तास्थापनेबाबत मतैक्य

अराजक माजलेल्या श्रीलंकेत सर्वपक्षीय सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत़  विरोधी पक्षांनी रविवारी बैठक घेऊन याबाबत चर्चा केली़  राजपक्षेंच्या सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडलेल्या पक्षांबरोबरच अन्य विरोधकांशी चर्चा करण्यात आल्याचे युनायटेड पीपल्स फोर्सच्या नेत्यांनी सांगितल़े  सर्वपक्षीय हंगामी सरकार स्थापन करण्याबाबत पक्षांमध्ये मतैक्य झाल्याचे सांगण्यात आले.