पीटीआय, कोलकाता
तब्बल ४२ दिवसांच्याखंडानंतर शनिवारी पश्चिम बंगालमधील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये आंदोलक डॉक्टर अंशत: कर्तव्यावर रुजू झाले. त्यातही बाह्यरुग्ण विभागांऐवजी (ओपीडी) केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन विभागांतच सेवा देण्याचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे. कोलकाता येथील आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ या डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले होते.

‘आम्ही आज कर्तव्यावर पुन्हा रुजू होण्यास सुरुवात केली. आमचे सहकारी आज सकाळपासून आपापल्या विभागांमध्ये फक्त अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांमध्ये परतू लागले आहेत. यात ओपीडींचा समावेश नाही. हे विसरू नका की, आम्ही अंशत:च कर्तव्यावर रुजू झालेलो आहेत, असे आंदोलन करणाऱ्या डॉ. अनिकेत महतो यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. आमचे इतर सहकारी राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये रवाना झाले आहेत, जेथे ते ‘अभय क्लिनिक’ (वैद्याकीय शिबिरे) सुरू करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>श्रद्धा वालकर हत्याकाडांची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले महिलेच्या शरीराचे २० तुकडे, कुठे घडली घटना?

पश्चिम बंगालमधील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर पुन्हा कामावर रुजू झाल्याने आपत्कालीन सेवा पूर्वपदावर आल्याचे चित्र आहे. ‘आमच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. आमचे त्यांच्या मागण्यांना समर्थन जरूर आहे. परंतु ‘काम बंद’ झाल्यामुळे आमच्यासारख्या नियमित रुग्णांना उपचार मिळणे खूप कठीण झाले होते, असे बांकुरा येथील वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्ण दीपंकर जाना म्हणाले.

दरम्यान, डॉक्टर पुन्हा सेवेत रुजू झाल्याने पूर्बा मेदिनीपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त पंसकुरा येथील ‘अभय क्लिनिक’मध्ये अनेक रुग्ण दाखल होऊ लागले. ‘आम्हाला या दवाखान्यांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या दवाखान्यांना भेटी दिल्या आणि आमच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. आम्ही या रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी तयार आहोत, ही आमची बांधिलकी आहे,’ असे कनिष्ठ डॉक्टर अहेली चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…

अन्यथा आंदोलनाची दुसरी फेरी

मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा आणि राज्याच्या आरोग्य सचिवांना हटवावे, यासारख्या मागण्या प्रशासनाकडून पूर्ण करण्यासाठी आणखी सात दिवसांची वाट पाहणार आहोत. अन्यथा ‘काम बंद’ आंदोलनाची दुसरी फेरी पुन्हा सुरू करू, असे आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी सांगितले. ९ ऑगस्टपासून आर जी कर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आल्यापासून डॉक्टर आंदोलन करीत आहेत. या मृत डॉक्टरला न्याय मिळावा तसेच या प्रकरणात सहभाग असलेल्या अधिकाऱ्यांना पदांवरून हटवावेे, ही आंदोलक डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.